Marathi Actress Aditi Dravid : मराठी मालिकाविश्वात गेल्या काही दिवसांत अनेक लोकप्रिय कलाकारांनी एन्ट्री घेतल्याचं पाहायला मिळालं. सोनाली खरे, अजय पुरकर, आदिनाथ कोठारे, कृतिका देव यांसारखे अनेक कलाकार सध्या टेलिव्हिजन विश्वात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवत आहेत. आता या पाठोपाठ आणखी एका अभिनेत्रीने छोट्या पडद्यावर कमबॅक केलं आहे. ती कोण आहे जाणून घेऊयात…

‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर गेली ४ वर्षे अधिराज्य गाजवणाऱ्या ‘अबोली’ मालिकेत एका खलनायिकेची एन्ट्री झालेली आहे. या भूमिकेचं नाव आहे शीतल सरपोतदार. जवळपास ३ वर्षांनी टेलिव्हिजनवर कमबॅक करून लोकप्रिय अभिनेत्री अदिती द्रविड ही खलनायिकेची भूमिका साकारणार आहे. यामुळे तिच्या सगळ्या चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे.

अदिती लिहिते, “मी ३ वर्षांनी पुन्हा एकदा टेलिव्हिजनवर काम करतेय. ‘स्टार प्रवाह’वरील ‘अबोली’ या मालिकेत छान, छोटीशी अशी भूमिका घेऊन पुन्हा एकदा मी तुमच्या भेटीला आली आहे. गंमत म्हणजे, ही व्हिलनची भूमिका आहे. त्यामुळे मलाही खूप मजा येतेय. यानिमित्ताने मी बऱ्याच काळानंतर मालिकेत पुन्हा एकदा काम करतेय. तर, असंच प्रेम माझ्यावर करत राहा आणि ही मालिका ‘स्टार प्रवाह’वर रोज रात्री नक्की बघा.”

अदितीच्या या पोस्टवर तिच्या चाहत्यांसह सिनेविश्वातील सेलिब्रिटींनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. अदिती उत्तम अभिनेत्री आहेच पण, याचबरोबर ती निवेदिका, गीतकार आणि नृत्यांगना म्हणून देखील ओळखली जाते.

अदिती द्रविडच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर आजवर ‘सुंदरा मनामध्ये भरली’, ‘माझ्या नवऱ्याची बायको’ अशा गाजलेल्या मालिकांमध्ये तिने महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. अदिती उत्तम गीतकार सुद्धा आहे. ‘बाईपण भारी देवा’ या सिनेमातील ‘मंगळागौर’ गाणं अदितीने स्वत: लिहिलं होतं. या गाण्याला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला होता. हे गाणं लोकप्रिय गायिका सावनी रविंद्रने गायलं आहे.