Star Pravah Premachi Goshta Off Air : ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर ‘प्रेमाची गोष्ट’ ही मालिका ४ सप्टेंबर २०२३ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या मालिकेतून अभिनेत्री तेजश्री प्रधानने छोट्या पडद्यावर पुनरागमन केलं होतं. तेजश्रीचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळेच ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेला सुरू झाल्यापासून प्रेक्षकांनी खूप पसंती मिळाली. टीआरपीच्या शर्यतीत सुद्धा ही मालिका कायम टॉप-५ मध्ये असायची. याशिवाय ‘प्रेमाची गोष्ट’चा ऑनलाइन टीआरपी सुद्धा चांगला होता.
मात्र, तेजश्रीने जानेवारी २०२५ मध्ये या मालिकेला रामराम ठोकला आणि तिच्या एक्झिटनंतर मालिकेच्या टीआरपीवर मोठा परिणाम झाला. सुरुवातीला ही मालिका ८ वाजताच्या प्राइम स्लॉटला प्रसारित केली जायची. मात्र, तेजश्रीने मालिका सोडल्यावर अवघ्या महिन्याभरात या शोची वेळ बदलण्यात आली. सुरुवातीला या मालिकेला साडेसहाचा आणि त्यानंतर दुपारी १ वाजताचा स्लॉट देण्यात आला.
आता लवकरच ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर समृद्धी केळकर आणि अभिषेक रहाळकर यांच्या मुख्य भूमिका असलेली ‘हळद रुसली, कुंकू हसलं’ ही मालिका सुरू होणार आहे. त्यामुळे ‘प्रेमाची गोष्ट’ ही मालिका सर्वांचा निरोप घेणार आहे. या मालिकेत सागर कोळी ही मुख्य भूमिका साकारणाऱ्या अभिनेता राज हंचनाळेने यासंदर्भात इन्स्टाग्राम स्टोरी देखील शेअर केली आहे.
राजने शेअर केलेल्या स्टोरीमध्ये ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेचा शेवट कसा होणार याची झलक पाहायला मिळत आहे. त्याने स्क्रिप्टचा फोटो शेअर केला आहे. यामध्ये सागर मुक्ताला तुमच्यामुळे घराला, मला पूर्णत्व मिळालं असं म्हणतोय आणि त्यानंतर मुक्ता देखील प्रेमाने सागरचा हात हातात घेईल…दोघांमध्ये प्रेमळ संवाद होऊन या मालिकेचा शेवट होणार आहे.
राजने शेअर केलेल्या स्क्रिप्टच्या फोटोच्या शेवटी “समाप्त…अंत: अस्ति” प्रारंभ असं लिहिण्यात आलं आहे. ही मालिका संपल्यावर ७ जुलैपासून समृद्धीची नवीन मालिका दुपारी १ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येईल.
दरम्यान ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेबद्दल सांगायचं झालं, तर राज हंचनाळेसह स्वरदा ठिगळे, अपूर्वा नेमळेकर, संजीवनी जाधव, बालकलाकार इरा परवडे यांनी या सिरियलमध्ये प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.