Premachi Goshta Last Episode Updates : ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका सप्टेंबर २०२३ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. यावेळी अभिनेत्री तेजश्री प्रधान या मालिकेत मुख्य भूमिका साकारत होती. तेजश्रीचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात असल्याने पहिल्याच आठवड्यात या मालिकेने टीआरपीच्या शर्यतीत टॉप-५ मध्ये एन्ट्री घेतली होती. यानंतर ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत मुक्ता आणि सागरचा भव्य विवाहसोहळा प्रेक्षकांना पाहायला मिळाला होता.
‘प्रेमाची गोष्ट’ मालिका घराघरांत पाहिली जात होती. मात्र, जानेवारी २०२५ मध्ये तेजश्रीने अचानक या मालिकेचा निरोप घेतला आणि संपूर्ण चित्र बदललं. ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका रात्री ८ वाजता प्राइम स्लॉटला प्रसारित केली जायची. पण, तेजश्रीच्या एक्झिटनंतर या मालिकेच्या टीआरपीवर मोठा परिणाम होऊन दोनदा वेळ बदलण्यात आली. आता अखेर दोन वर्षे छोट्या पडद्यावर अधिराज्य गाजवल्यावर ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका सर्वांचा निरोप घेणार आहे.
‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेच्या अंतिम भागात काय पाहायला मिळणार? याची उत्सुकता प्रत्येकाच्या मनात होती. अखेर शेवटच्या भागाचा प्रोमो वाहिनीने शेअर केला आहे.
यामध्ये मुक्ता आणि सागर प्लॅन करून सावनीचं खरं रूप कोळी कुटुंबीयांसमोर आणणार असं पाहायला मिळत आहे. सावनी मुक्ताला जीवे मारण्याचा प्रयत्न करते. पण, इतक्यात तिथे सागर सर्व शूटिंग करत पोहोचतो. सावनीचं सगळं कारस्थान उघड होऊन मुक्ता तिला कानशिलात वाजवते. अशाप्रकारे सावनीच्या पापाचा घडा भरून ही मालिका सर्वांचा निरोप घेणार आहे.
‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेचा अंतिम भाग ५ जुलै दुपारी १ वाजता ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर प्रसारित केला जाणार आहे. नेटकऱ्यांनी या प्रोमोच्या कमेंट्समध्ये प्रतिक्रिया देत संपूर्ण टीमला पुढील प्रोजेक्टसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान, ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका संपल्यावर आता याऐवजी ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर ‘हळद रुसली कुंकू हसलं’ ही नवीन मालिका सुरू होणार आहे. या मालिकेत अभिनेत्री समृद्धी केळकर आणि अभिनेता अभिषेक रहाळकर यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.