Tejashri Pradhan New Serial Vin Doghantali Hi Tutena : ‘झी मराठी’ वाहिनीवर तेजश्री प्रधान व सुबोध भावे यांची प्रमुख भूमिका असलेली ‘वीण दोघांतली ही तुटेना’ ही मालिका येत्या ११ ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मालिकेत स्वानंदी आणि समर यांच्या तडजोडीने झालेल्या लग्नाची गोष्ट प्रेक्षकांना पाहायला मिळेल. समर आपल्या बहिणीच्या सुखासाठी तर, स्वानंदी आपल्या भावासाठी लग्नाचा निर्णय घेते.
या नव्या मालिकेत ‘तुला पाहते रे’ या गाजलेल्या मालिकेतून घराघरांत लोकप्रिय झालेली अभिनेत्री सुद्धा महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे. या अभिनेत्रीचं नाव आहे पूर्णिमा डे. तिने ‘तुला पाहते रे’मध्ये सोनिया सरंजामे ही भूमिका साकारली होती. तर, या नव्या मालिकेत ती अधिरा राजवाडे ही भूमिका साकारणार आहे.
अधिरा ही समरची बहीण असते. एक श्रीमंत, आत्मविश्वासू, जिद्दी आणि बिनधास्त मुलगी. यापूर्वी ‘तुला पाहते रे’ या मालिकेत सुद्धा पूर्णिमा आणि सुबोध यांनी एकत्र काम केलं होतं. आता पुन्हा एकदा सुबोधसह स्क्रीन शेअर करायला मिळणार असल्याने पूर्णिमा प्रचंड आनंदी आहे.
मालिकेत अधिरा ही समरची खूपच लाडाची बहीण असते. अधिराचं तिच्या भावावर खूप प्रेम असतं. समरने सुद्धा तिला त्याच मायेने वाढवलेलं असतं. अधिराचा स्वभाव काहीसा हट्टी असतो. या भूमिकेबद्दल पूर्णिमा सांगते, “अधिरा राजवाडेला फॅशन डिझायनर व्हायचं असतं. ती प्रचंड श्रीमंत आहे आणि तिला कोणत्याच गोष्टीची चिंता नसते. ती प्रेमाबद्दल खूप पॅशनेट आहे. अधिराचं तिच्या पिंट्या दादावर प्रचंड प्रेम आहे आणि त्याचाही तिच्यावर जीव आहे. ती संपूर्ण घरात फक्त पिंट्या दादाला मानते. अधिराचा पिंट्या दादा म्हणजेच सुबोध भावे. वडील नसल्याने ती दादालाच आपल्या वडिलांसमान मानते. अधिरा GenZ मुलगी आहे आणि तिचा दादा तिचे सगळे हट्ट पूर्ण करतो.अधिराचं रोहितवर ( राज मोरे ) प्रचंड प्रेम असतं आणि त्याच्यासाठी ती काहीही करू शकते. तिला जगाच काय सुरूये याची काहीच पर्वा नसते. पैशांचा माज देखील असतो कारण अधिरा प्रचंड श्रीमंतीत मोठी झालेली असते.”
“लग्नाच्या प्रोमो शूटला खूपच मजा आली कारण आम्ही सर्वजण एकत्र होतो. मला प्रोमोमध्ये अधिरा राजवाडेचा लूक कमाल वाटला. सर्व टीम एकत्र असल्यामुळे गप्पा गोष्टी, स्वादिष्ट जेवण आणि धमाल-मस्ती करत आम्ही त्या प्रोमोचं शूट पूर्ण केलं. सेटवर सुबोध दादा, चंदू सर, विनायक सर आणि मंदार हे माझे आधी पासूनचे गुरु, मित्र, सहकलाकार, दिग्दर्शक आहेत. आता या लिस्टमध्ये नवीन नावं जोडली जाणार आहेत ती म्हणजे तेजू, सुलभा ताई आणि किशोरी ताई. या मालिकेच्या निम्मिताने शर्मिला शिंदेशीही माझी लगेच मैत्री झाली आमच्या बऱ्याच गोष्टी जुळल्यात आमचे मेकअप पाऊच आणि बऱ्याच गोष्टी सेम आहेत. राज मोरेशी ( रोहित ) सुद्धा हळुहळू मैत्री होईलच कारण आमचे बरेच सीन एकत्र होणार आहेत.” असं पूर्णिमाने सांगितलं आहे.
दरम्यान, ‘वीण दोघांतली ही तुटेना’ ही मालिका ११ ऑगस्टपासून सायंकाळी ७:३० वाजता ‘झी मराठी’ वाहिनीवर प्रसारित केली जाणार आहे.