Tejashri Pradhan on shooting of serial: अभिनेत्री तेजश्री प्रधान ही तिच्या अभिनयासाठी ओळखली जाते. मालिका आणि चित्रपटांतील जवळजवळ सर्वच भूमिकांचे प्रेक्षकांनी कौतुक केले आहे. अभिनेत्रीने तिच्या अभिनयातून मोठा चाहतावर्ग निर्माण झाला आहे.

अभिनयाबरोबरच अभिनेत्री अनेकदा तिच्या सोशल मीडियावरील पोस्ट, मुलाखतींमधील वक्तव्ये यांमुळेही चर्चेत असते. आता अभिनेत्रीने एका मुलाखतीत मालिकेतील सीन आणि खऱ्या आयुष्यातील भावना यांवर वक्तव्य केले आहे. ती नेमकं काय म्हणाली, ते जाणून घेऊ…

मालिकेतील सीन आणि खऱ्या आयुष्यातील भावना यावर तेजश्री प्रधान काय म्हणाली?

अभिनेत्री तेजश्री प्रधानने काही दिवसांपूर्वी डॉ. आनंद नाडकर्णी यांच्याशी संवाद साधताना मालिकेतील सीन आणि खऱ्या आयुष्यातील भावना यांवर वक्तव्य केले आहे. अभिनेत्री म्हणाली, “मी जेव्हा मालिकेचे शूटिंग करीत असते. तेव्हा बऱ्याचदा असं होतं की, एखादा सीन मनाला भावत नाही. किंवा असंही वाटतं की, असं कुठे खऱ्या आयुष्यात घडतं? असं कोण वागतं? कारण- आपण पुणे-मुंबईसारख्या शहरांमध्ये राहतो, तिथे वावरतो. त्यामुळे गोष्टी पटकन मनाला पटत नाहीत. प्रत्येक राज्यातील, शहरांतील माणसांची मानसिकता वेगळी असते.

“नायिकेला सतत अडचणींचा सामना करावा लागतो. तिच्यावर एवढा दु:खाचा डोंगर असतो. एवढ्या कसोट्यांमधून ती जात असते, असं आपण मालिकांमध्ये दाखवतो. इतकं सगळं आपण का दाखवतो? आजच्या काळामध्ये सोपं, साधं का नाही दाखवलं जात, असं वाटतं.”

पुढे अभिनेत्री असे म्हणाली, “यावर विचार केल्यावर असं वाटतं की, कुठेतरी बाहेरच्या, छोट्या छोट्या शहरांमध्ये राहणारी एखादी बाई ती तुमच्याकडे पाहत असते. टीव्हीवरील नायिका अडचणींमधून जात असेल, तर ती कुठेतरी स्वत:च्या आयुष्यातील ती भावना त्याबरोबर जोडते. मग तिला असं वाटतं की आपली लाडकी नायिका या सगळ्या दु:ख, अचडणींमधून गेली आणि रडल्यानंतरसुद्धा ती आज खंबीरपणे उभी राहिली, तर आपणसुद्धा खंबीरपणे उभे राहूयात.”

लवकरच तेजश्री नवीन मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या मालिकेचे नाव ‘वीण दोघांतली ही तुटेना’ असे आहे. या मालिकेत अभिनेता सुबोध भावेदेखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. आता नवीन भूमिकेतून अभिनेत्री पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.