Tharala Tar Mag Serial New Entry : ‘ठरलं तर मग’मध्ये काही दिवसांपूर्वीच प्रियाचे आई-बाबा म्हणून मालिकेत दोन नव्या कलाकारांची एन्ट्री झाली. प्रियाच्या पालकांची भूमिका राजन जोशी व किर्ती पेंढारकर ( मिस्टर अँड मिसेस लोखंडे ) साकारत आहेत. या पाठोपाठ आता मालिकेत एका नव्या अभिनेत्याची एन्ट्री झालेली आहे. याचे फोटो नुकतेच सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

‘ठरलं तर मग’ मालिकेत अस्मिताच्या नवऱ्याची एन्ट्री झालेली आहे. अस्मिताचा नवरा सचिन मालिकेत केव्हा दिसणार याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. अखेर सचिन सुभेदारांच्या घरी येऊन पोहोचला आहे. मात्र, अस्मिताला भेटण्यापूर्वी सचिन साक्षी शिखरेला जाऊन भेटतो. साक्षी जेलमधून बाहेर आलीये आणि ती सध्या ओळख बदलून बाहेरच्या जगात वावरतेय. तिने सोशल मीडियावर समीरा नावाने स्वत:चं अकाऊंट ओपन केलं आहे. याच माध्यमातून साक्षी शिखरे म्हणजेच समीरा आणि सचिन यांची ओळख होते.

समीरा आणि सचिन एकत्र भेटतात, गप्पागोष्टी करतात. साक्षी खोटी ओळख दाखवून सचिनला आपल्या जाळ्यात ओढण्याचा पुरेपूर प्रयत्न करतेय आणि सचिन सुद्धा तिच्या प्रेमात पडला आहे. अस्मिताला या सगळ्याबद्दल काहीच माहिती नाही. कारण, साक्षीला भेटल्यावर तो सुभेदारांच्या घरी पोहोचतो आणि तितक्याच प्रेमाने सर्वांची चौकशी करतो असं मालिकेत पाहायला मिळेल.

अस्मिताचा नवरा साक्षीशी करतोय फ्लर्ट

‘ठरलं तर मग’ मालिकेत या सचिनची भूमिका लोकप्रिय अभिनेता नकुल घाणेकर साकारणार आहे. आजवर अनेक मराठी मालिकांमध्ये त्याने महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. नकुल उत्तम नर्तक देखील आहे. ‘जय मल्हार, ‘अजूनही चांदरात आहे’ अशा गाजलेल्या मालिकांमध्ये तो झळकला आहे.

ठरलं तर मग मालिकेत नकुल घाणेकरची एन्ट्री

दरम्यान, आता सचिनची एन्ट्री झाल्यावर मालिकेत काय वळण येणार? सचिनला हाताशी घेऊन साक्षी व महिपत अर्जुनला त्रास देण्याचा प्रयत्न करतील का? आणि या सगळ्यात अस्मिताच्या संसाराचं काय होणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आगामी भागात हळुहळू प्रेक्षकांना या सगळ्याची उत्तरं मिळतील. ही मालिका रोज रात्री ८:३० वाजता ‘स्टार प्रवाह’वर प्रसारित केली जाते.