Tharala Tar Mag Fame Amit Bhanushali Emotional Post For Purna Aaji : दिवंगत ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं ‘ठरलं तर मग’ मालिकेतील प्रत्येक कलाकाराशी खूप छान बॉण्डिंग होतं. १६ ऑगस्टला त्यांच्या निधनाची बातमी समोर येताच प्रत्येकाला धक्का बसला होता. मालिकेतील त्यांच्या सहकलाकारांसह संपूर्ण मराठी कलाविश्वावर शोककळा पसरली होती. काही दिवसांपूर्वीच ‘ठरलं तर मग’ मालिकेने ९०० भागांचा मोठा टप्पा पार केला. यावेळी सुद्धा लाडक्या पूर्णा आजीच्या आठवणीत सेटवरचे कलाकार भावुक झाले होते.
मालिकेत अर्जुनची भूमिका साकारणारा अभिनेता अमित भानुशालीने पूर्णा आजीची आठवण सांगत भावुक पोस्ट शेअर केली आहे. ‘ठरलं तर मग’च्या सेटवर रिडिंग रूम आहे, याठिकाणी पूर्णा आजीची खुर्ची आहे. तिथे अजूनही कोणीही बसत नाही. सेटवर जाताना अजूनही डोळे फक्त तुलाच शोधतात असं सांगत अर्जुनने दु:ख व्यक्त केलं आहे.
अमित भानुशालीची भावनिक पोस्ट
आजी, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…आज तुझा वाढदिवस आहे त्यामुळे तुझी आठवण आज जरा जास्तच येतेय. तू माझ्यासाठी फक्त एक अभिनेत्री नव्हतीस, जिच्यासोबत काम करण्याचं भाग्य मला लाभलं. तू माझ्यासाठी माझी आजी होतीस…
तुझं अभिनय कौशल्य, तुझं व्यक्तिमत्त्व आणि तुझं निरागस प्रेम… हे सगळं अजूनही मनात कोरलेलं आहे. आजी, तू नेहमी आशीर्वादासारखी, सावलीसारखी माझ्या प्रत्येक पावलावर आहेस.
आपण सेटवर केलेली मस्ती ते जोरजोरात हसणं, अजूनही आठवतंय – तू पुण्याहून क्रीम रोल आणि भाकरवडी घेऊन यायचीस आणि किती उत्साहाने सगळ्यांमध्ये वाटायचीस. सीनच्या मध्ये तू नेहमी मला बाजूला घेऊन म्हणायचीस- “बाळा, अजून चांगलं करू शकतोस, तुझ्यात ते कौशल्य आहे” आणि तुझ्या त्या शब्दांतून मी केवळ अभिनयच नाही, तर माणूसपणही शिकलो.
आजी, ती तुझी खुर्ची… अजूनही रिकामीच आहे. आठवतंय, मी मुद्दाम तुझ्या खुर्चीत बसायचो आणि जेव्हा तू यायचीस तेव्हा नकळत तुझ्याकडे न पाहिल्यासारखं वागायचो. मग अचानक उठून तुला खुर्ची देऊन हसायचो आणि तू छडी दाखवून खोटं-खोटं रागवायचीस… तो गोडपणा आजही माझ्या डोळ्यांत पाणी आणतो.
तुझ्यातलं सगळ्यात अनोखं असं होतं – तू सगळ्यांमध्ये सहज मिसळून जायचीस. तरुणांमध्ये तू एक खोडकर मूल व्हायचीस, आम्हाला शिकवताना आईसारखी प्रेमळ असायचीस, आणि माझ्यासाठी खरी आजी – जिचं ममत्व, जिचं प्रेम शब्दांपलीकडचं होतं.
सेटवर जाताना अजूनही माझे डोळे तुलाच शोधतात. माहीत आहे की तू नाही आहेस… सगळं कळतं मला तरी सुद्धा अजूनही वाटतं – त्या दारातून तूच आत येशील आणि तुझ्या तेजस्वी स्मितहास्याने “गुड मॉर्निंग” म्हणशील.
आजी, तू जरी आमच्यात नसलीस तरी…माझी लाडकी आजी, माझी प्रेरणा, माझं बळ म्हणून… तू सदैव माझ्यासोबत आहेस.
या सुंदर दिवशी तुला मनापासून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
लव्ह यू ऑलवेज, आजी
Wish you a very happy birthday my sweet aaji
दरम्यान, अर्जुनप्रमाणे ज्योती चांदेकर यांची मुलगी लोकप्रिय अभिनेत्री तेजस्विनी पंडितने देखील आईच्या आठवणीत भावनिक पोस्ट शेअर करत आता तिच्या राहिलेल्या इच्छा पूर्ण करणार असल्याचं म्हटलं आहे.