Tharala Tar Mag Fame Jui Gadkari : ‘ठरलं तर मग’ मालिकेला येत्या ५ डिसेंबरला ३ वर्षे पूर्ण होणार आहेत. ही मालिका पहिल्या दिवसापासून टीआरपीच्या शर्यतीत अव्वलस्थानी आहे. सायली-अर्जुनचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज, नंतरची यांची प्रेमकहाणी, सायलीचा भूतकाळ, तिचे खरे आई-वडील हे मालिकेचं हटके कथानक प्रेक्षकांच्याही पसंतीस उतरलं आहे. गेली तीन वर्षे टीआरपी टॉपर असणारी मालिका जेव्हा जुई गडकरीला ऑफर झाली होती, तेव्हा तिची प्रतिक्रिया काय होती याबद्दल अभिनेत्रीला एका चाहतीने प्रश्न विचारला. यानंतर जुईने या चाहतीला तिच्या लूकटेस्टचा फोटो दाखवला, पाहुयात हा खास फोटो…
‘ठरलं तर मग’ मालिकेत अभिनेत्री जुई गडकरी सायली ही प्रमुख भूमिका साकारत आहे. सायली-अर्जुनची जोडी आता महाराष्ट्राच्या घराघरांत लोकप्रिय झालेली आहे. हे दोघंही सोशल मीडियावर सक्रिय असतात.
अभिनेत्री जुई गडकरीने काही दिवसांपासून इन्स्टाग्रामवर ‘आस्क मी सेशन’ घेतलं होतं. यामध्ये अभिनेत्रीच्या एका चाहतीने तिला, “ताई, तुला जेव्हा पहिल्यांदा ‘ठरलं तर मग’ मालिकेतील मुख्य भूमिकेसाठी विचारणा झाली होती तेव्हा तुझी पहिली प्रतिक्रिया काय होती?” असा प्रश्न विचारला.
चाहतीच्या प्रश्नाला उत्तर देताना जुईने तिच्या लूक टेस्टचा फोटो सोशल मीडियावर शेअर केल्याचं पाहायला मिळालं. जुई लिहिते, “हा माझ्या लूक टेस्टचा फोटो आहे. ‘ठरलं तर मग’ मालिकेसाठी मी घरातूनच लूकटेस्ट पाठवली होती. माझा नो मेकअप लूक आहे…तारीख होती १९ जुलै २०२२, याच दिवशी भूमिकेसाठी माझी निवड करण्यात आली होती. मला काहीही कळायच्या आत माझं कास्टिंग झालं होतं. सायली ही भूमिका माझ्यासाठी देवानं पाठवलीये.” पुढे ५ डिसेंबर २०२२ रोजी या मालिकेचा पहिला भाग प्रसारित करण्यात आला होता.
जुई गडकरी कायमच ‘ठरलं तर मग’ मालिकेतील भूमिकेसाठी कृतज्ञता व्यक्त करताना दिसते. अभिनेत्रीने यापूर्वी देखील अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलेलं आहे. याशिवाय जुई ‘बिग बॉस मराठी’मध्येही सहभागी झाली होती.
दरम्यान, ‘ठरलं तर मग’ मालिकेबद्दल सांगायचं झालं तर, सध्या या शोमध्ये सायली तिच्या खऱ्या आई-बाबांचं शोध घेत असल्याचा सीक्वेन्स चालू आहे. आता मधुभाऊ तिला सदाशिव आणि मैनावती तुझे आई-बाबा नाहीत असा इशारा देणार आहेत. आता यानंतर मालिका कोणतं नवीन वळण घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
