Tharala Tar Mag Fame Actress Buys New Car : ‘ठरलं तर मग’ मालिकेतील सगळेच कलाकार आता घराघरांत लोकप्रिय झाले आहेत. यामध्ये सायलीच्या खऱ्या आईची भूमिका म्हणजेच प्रतिमाची भूमिका अभिनेत्री शिल्पा नवलकर साकारत आहेत. त्यांच्या भूमिकेला प्रेक्षकांची पहिल्या दिवसापासून पसंती मिळाली आहे. शिल्पा नवलकर या ‘ठरलं तर मग मालिकेच्या संवाद लेखिका सुद्धा आहे. नुकतीच त्यांनी सोशल मीडियावर एक खास बातमी शेअर केली आहे.

शिल्पा नवलकर यांनी आजवर अनेक मालिका तसेच चित्रपटांमध्येही काम केलेलं आहे. त्यांचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. त्यांनी नुकत्याच शेअर केलेल्या एका इन्स्टाग्राम स्टोरीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. शिल्पा नवलकर यांनी नवीन गाडी घेतली आहे. नव्या गाडीचा पहिला लूक त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.

शिल्पा नवलकर नवीन गाडी खरेदी करण्यासाठी पती ऋषी देशपांडे आणि मुलगी कुहू यांच्यासह पोहोचल्या होत्या. त्यांचे पती देखील अभिनय क्षेत्रात सक्रिय आहेत. शाहरुख खानच्या पहेली चित्रपटातून ऋषी यांनी बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. यानंतर त्यांनी अनेक चित्रपट व व्यावसायिक जाहिरातींमध्ये काम केलं. शिल्पा व ऋषी या दोघांनी मिळून नव्या गाडीची पूजा केली. यानंतर त्यांची मुलगी नव्या गाडीच्या ड्रायव्हिंग सीटवर बसल्याचं पाहायला मिळालं. या नव्या गाडीसाठी शिल्पा नवलकर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे.

शिल्पा नवलकर यांनी आजवर ‘अजूनही चांदरात आहे’, ‘दुर्गा’, ‘वहिनीसाहेब’ अशा बऱ्याच मालिकांमध्ये काम केलेलं आहे. ‘ठरलं तर मग’ मालिकेत त्यांनी साकारलेली प्रतिमाची भूमिकेला खऱ्या अर्थाने सर्वत्र लोकप्रिय ठरली. याशिवाय ‘बाईपण भारी देवा’ या गाजलेल्या चित्रपटात सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे.

https://images.loksattaimg.com/2025/11/shilpa.mp4

दरम्यान, ‘ठरलं तर मग’ मालिकेबद्दल सांगायचं झालं तर, आता हळुहळू प्रतिमाला जुन्या गोष्टी आठवू लागल्या असून तिच्या मनात सायलीविषयी ओढ निर्माण झाली आहे. आता या मायलेकींना संपूर्ण भूतकाळ केव्हा आठवणार याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.