Tharala Tar Mag Fame Jui Gadkari Shares Last Video With Purna Aaji : ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं १६ ऑगस्ट रोजी निधन झालं. वयाच्या ६९ व्या वर्षी त्यांची पुण्यात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर मराठी मनोरंजनसृष्टीतील कलाकार, ज्योती चांदेकर यांचे मालिकेतील सहकलाकार आणि चाहत्यांनी सोशल मीडियावर हळहळ व्यक्त केली आहे. पूर्णा आजी आम्ही तुला कधीच विसरू शकणार नाही, तुझी जागा कोणीही घेऊ शकणार नाही…अशा भावनिक प्रतिक्रिया प्रेक्षकांकडून दिल्या जात आहे.

‘ठरलं तर मग’ मालिकेची मुख्य नायिका सायली म्हणजेच जुई गडकरीचं देखील तिच्या लाडक्या पूर्णा आजीबरोबर खूप सुंदर बॉण्डिंग होतं. दोघीही सेटवर एकत्र असायच्या, एकत्र व्हिडीओ-फोटो शेअर करायच्या. या दोघींमध्ये मालिकेप्रमाणे ऑफस्क्रीन सुद्धा आजी अन् नातीचं गोड नातं तयार झालं होतं. त्यामुळे ज्योती चांदेकरांच्या निधनानंतर जुईला देखील खूप मोठा धक्का बसला. “आजी तू फसवलंस…तू परत आलीच नाहीस” अशी भावुक पोस्ट शेअर करत जुईने भावना व्यक्त केल्या. याशिवाय ज्योती चांदेकर यांना अखेरचा निरोप देण्यासाठी जुई, सुचित्रा बांदेकर, अमित भानुशाली हे कलाकार पुण्यात देखील उपस्थित होते.

‘ठरलं तर मग’ मालिकेच्या संपूर्ण टीमला या दु:खातून सावरण्यासाठी काही दिवस वेळ द्या, हे दु:ख खूप मोठं आहे… आम्ही तिला कधीच विसरू शकणार नाही. असं निर्मात्या सुचित्रा बांदेकरांनी नुकत्याच ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे. याचदरम्यान, अभिनेत्री जुई गडकरीने लाडक्या पूर्णा आजीच्या आठवणीत त्यांच्या दोघींचा सेटवरचा शेवटचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर गोकुळाष्टमीनिमित्त तीन मालिकांचा विशेष महासंगम भाग आयोजित करण्यात आला होता. यादरम्यान सेटवर पूर्णा आजी आणि सायली दोघीही एकत्र वेळ घालवत होत्या. या व्हिडीओला जुईने, “माझ्याच वयाची मैत्रीण” असं कॅप्शन दिलं होतं. अभिनेत्री आज पुन्हा एकदा तो व्हिडीओ शेअर करत लिहिते, “आम्हा दोघींचा एकत्र सेटवरचा शेवटचा व्हिडीओ…महासंगमचं शूट सुरू असताना रात्री हा व्हिडीओ काढला होता.” पूर्णा आजीच्या आठवणीत जुईने हा व्हिडीओ शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

जुई आणखी एक व्हिडीओ शेअर करत लिहिते, “शो मस्ट गो ऑन…किती सहज म्हणतात ना हे वाक्य हल्ली! पण खरंच इतकं सोपं आहे का ते? इतकं सहज मूव्ह ऑन करणं? जेवणाच्या टेबलवर आता रोज दुपारी गोड खाण्यावरून भांडण नाही होणार…”

https://images.loksattaimg.com/2025/08/AQOvFOk4LlorIPfpsixvwcbssshLU-mzx1Cf0HYY95YnT07q5n9P2pDgmlgSEsuyz_Efu6CV2mdrkXMFEYXsg943WNQ99aOudw2afzo.mp4

दरम्यान, ‘ठरलं तर मग’च्या चाहत्यांनी निर्माते आणि चॅनेलला विनंती करत कृपया पूर्णा आजीची भूमिका रिप्लेस करून नका, आम्ही त्यांना खूप मिस करतोय अशा कमेंट्स केल्या आहेत.