Actress Jyoti Chandekar Passed Away : ‘ठरलं तर मग’ मालिकेतील ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांच्या निधनाने संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. वयाच्या ६९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या ३-४ दिवसांपासून त्यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. गेल्या अडीच वर्षांपासून त्या ‘ठरलं तर मग’ मालिकेत पूर्णा आजीची भूमिका साकारत होत्या. त्यांच्या निधनानंतर मालिकेतील कलाकारांना सुद्धा मोठा धक्का बसला आहे.

‘ठरलं तर मग’ मालिकेत अर्जुनची भूमिका साकारणाऱ्या अमित भानुशालीने ज्योची चांदेकर यांच्या निधनानंतर भावुक पोस्ट शेअर केली आहे.

अमित भानुशालीची पोस्ट

“अजूनही विश्वास बसत नाही की, तू आता आमच्यात नाहीस पूर्णा आजी… तुझी खूप आठवण येईल. तू माझ्यासाठी फक्त सहकलाकार नव्हतीस, तर एक शिक्षिका, एक गुरु होतीस. ज्यांनी मला फक्त अभिनय किंवा परफॉर्मन्स नाही तर जीवनावर प्रेम करायला शिकवलं. तुझं आयुष्य जगण्याचं बिंधास्त आणि आनंदी तत्त्वज्ञान नेहमी माझ्यासाठी प्रेरणा राहील. तुझा हसरा चेहरा, तुझा उत्साह, आणि प्रत्येक क्षण मनापासून जगण्याची तुझी पद्धत कायम आठवत राहील. शांती लाभो आजी… तुझ्या गोड आठवणी आणि शिकवणी कायम हृदयात जपून ठेवेन.”

ज्योती चांदेकर यांच्याबद्दल…

ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांनी ‘गुरू’, ‘ढोलकी’, ‘तिचा उंबरठा’, ‘पाऊलवाट’, ‘सलाम’, ‘सांजपर्व’ अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं आहे. याशिवाय छोट्या पडद्यावरील ‘तू सौभाग्यवती हो’, ‘छत्रीवाली’ या मालिकांमध्येही त्यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. मात्र, ‘ठरलं तर मग’ मालिकेतील त्यांनी साकारलेली पूर्णा आजीची भूमिका सर्वत्र प्रचंड लोकप्रिय झाली होती. त्यांच्या निधनानंतर मालिकेच्या चाहत्यांवर सुद्धा शोककळा पसरली आहे.