Tu Hi Re Maza Mitwa Promo : ‘तू हि रे माझा मितवा’ ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. यामध्ये अभिनेत्री शर्वरी जोग व अभिजीत आमकर मुख्य भूमिकेत आहेत. या दोघांची मालिकेतील ऑनस्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडते. अशातच सध्या मालिकेत दोघांचं नातं हळू हळू बहरत असल्याचं पाहायला मिळत आहे.

मालिकेत ईश्वरी व अर्णव हे पूर्वी सतत एकमेकांबरोबर भांडत असायचे. राग राग करायचे; पण आता मात्र लग्नानंतर दोघांमध्ये छान मैत्री झाली असून, हळूहळू त्यांचं नातं बहरत असल्याचं दिसतं. अर्णवनं शर्वरीला राकेशपासून वाचवलं आणि मालिकेत तो नेहमी तिची काळजी घेताना पाहायला मिळतं. अशातच आता मालिकेचा नवीन प्रोमो समोर आला आहे.

मालिकेच्या या नवीन प्रोमोमध्ये ईश्वरीने अर्णवसाठी खास सरप्राईज प्लॅन केल्याचं दिसतं. ‘स्टार प्रवाह’ वाहिनीनं त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून या मालिकेचा नवीन प्रोमो शेअर करीत त्याला ‘असे मानणार ईश्वरी अर्णवचे आभार…’ अशी कॅप्शन दिली आहे. तर हा भाग प्रेक्षकांना १० ते ११ नोव्हेंबरदरम्यान पाहायला मिळणार आहे. समोर आलेल्या प्रोमोमध्ये ईश्वरीनं अर्णवसाठी खास सरप्राईज प्लॅन केल्याचं दिसतं; परंतु तिचं हे सरप्राईज फसतं, असं पाहायला मिळतं.

ईश्वरीने केलेला प्लॅन फसणार?

समोर आलेल्या प्रोमोमध्ये ईश्वरी “मीडियासमोर माझी ईश्वरी म्हणत मला सावरून घेतलं म्हणून सरांना एक थँक्यू तो बनता हैं,” असं म्हणताना दिसते. त्यासाठी तिनं त्यांची खोली छान सजवलेली प्रोमोतून पाहायला मिळते. बेडवर ईश्वरीनं ‘थँक्यू’, असंही लिहिलेलं दिसतं. त्यानंतर प्रोमोत पुढे अर्णव खोलीत येताना दिसतो आणि तो हे सगळं पाहून आनंदी होतो. परंतु, तेवढ्यात ईश्वरी तिथे फुलांचा पुष्पगुच्छ घेऊन येते. पण, त्यामुळे अर्णवला शिंका येतात आणि तो तिला “मंद… मला अॅलर्जी आहे फुलांची आता मला थँक्यूऐवजी सॉरी म्हण,” असं म्हणताना दिसतो. हे सगळं पाहून ईश्वरीचा गोंधळ होतो आणि ती अर्णवला सॉरी म्हणते; पण ती पुष्पगुच्छ त्याच्या अजून जवळ घेऊन जाते. त्यामुळे तो तिला “तू अशक्य आहेस”, असं म्हणतो.

त्यामुळे आता शर्वरीनं अर्णवसाठी प्लॅन केलेलं हे खास सरप्राईज बिघडणार का की अर्णव तिला समजून घेईल? तसेच या दोघांमध्ये यानिमित्त जवळीक वाढणार की पुन्हा वाद होणार हे पाहणंही रंजक ठरेल.