Tula Shikvin Changalach Dhada Off Air : ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या लोकप्रिय मालिकेने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला. तब्बल २ वर्षे छोट्या पडद्यावर अधिराज्य गाजवल्यावर ही मालिका ऑफ एअर झाली. गेल्या २ वर्षांत या मालिकेतील सगळे कलाकार घराघरांत लोकप्रिय झाले. अक्षरा-अधिपतीची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. याशिवाय भुवनेश्वरी, चारुहास, दुर्गेश्वरी या सगळ्याच पात्रांना प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं.

‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेत लोकप्रिय अभिनेते स्वप्नील राजशेखर यांनी चारुहास म्हणजे अधिपतीच्या बाबांची भूमिका साकारली होती. मालिका संपल्यावर त्यांना रात्री साडेबारा वाजता एका चाहत्याचा फोन आला होता. हा किस्सा त्यांनी फेसबुक पोस्ट शेअर करत सांगितला आहे.

स्वप्नील राजशेखर यांची पोस्ट

काल रात्री १२.३० वाजता एक अपरिचित नंबर वरुन फोन आला. अशा वेळीचे फोन आपण घेतो…
अवेळी कुणी उगाच फोन करणार नाही..
मी हॅलो म्हणताच पलीकडून आवाज आला…
“साहेब तुमची सिरीयल बंद झाली??”
मी दचकून बाहेर बघितलं, अंधार होता.
रात्रीचेच १२.३० वाजले होते..
मी तरीही संयमाने विचारलं
“क.. कोण बोलतंय?!”
“अमुक अमुक बोलतोय”
माझ्याकडे नंबर सेव्ह नव्हता, सदर गृहस्थ माझ्या परिचयाचे नव्हते… आठवत तरी नव्हते….आणि अचानक रात्री १२.३० वाजता “सिरीयल बंद झाली का?!” हे विचारायला फोन करणाऱ्या अनोळखी गृहस्थांशी कसं डील करायचं याचं प्रशिक्षण झालेलं नसल्याने मी खचलो…
मी सावरत अन् संयमाने विचारलं… “हे विचारायला तुम्ही यावेळी फोन केलात?”
त्यांचं उत्तर ‘जडावल्या’ आवाजात आलं असतं तर मला बरं वाटलं असतं…
“जान दो पिएला है” हे आपल्या मनाची समजूत घालायला बरं असतं!! पण ते प्यायलेले वाटत नव्हते…
“आता पोस्ट पाहिली तुमची… मग म्हटलं विचारावं” असं काही तरी म्हणाले.. त्यांच्या शेजारी त्यांचे श्रोते होते एवढं समजलं…
गृहस्थ चांगले शिकलेले होते..
मी हताशपणे फक्त फोन कट केला.
नंबर ब्लॉक केला.
“मालिकेच्या एका हार्डकोर चाहत्याला सिरीयल बंद झाल्याची पोस्ट पाहून आपलं कुणीतरी गचकल्याचं फिलिंग आलं, आणि त्या ईमरजंसी मध्ये त्यांनी ढचकन फोन काढून लावला…’
इतकं सहज आहे हे… जग सगळं नॉर्मल सुरुये”
असं मनाला समजावत मी पुन्हा झोपी गेलो…

दरम्यान, स्वप्नील राजशेखर यांच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. “तुमचा अभिनय हे महत्वाचे कारण होते सिरीयल पाहायचे..”, “खूप साऱ्या Comment आल्या आहेत… नंबर द्या म्हणून… तेवढं घ्या की मनावर आता…”, “दादा फक्त तुमच्यासाठी आम्ही मालिका पाहायचो”, “खरंच खूप फॅन्स होते या मालिकेचे…” अशा प्रतिक्रिया युजर्सनी अभिनेत्याच्या पोस्टवर दिल्या आहेत. या मालिकेचा शेवटचा भाग २५ मे रोजी प्रसारित करण्यात आला होता.