Zee Marathi Uncha Majha Zoka Serial : रमाबाई रानडे यांच्या जीवनावर आधारित ‘उंच माझा झोका’ ही मालिका ५ मार्च २०१२ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या मालिकेला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं. ऐतिहासिक काळ, रमाबाईंचं जीवन, या मालिकेचं शीर्षक गीत या सगळ्याच गोष्टी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या होत्या.

या मालिकेत रमाबाई रानडे यांच्या बालपणीची भूमिका अभिनेत्री तेजश्री वालावलकरने साकारली होती. शाळा, अभ्यास, परीक्षा या सगळ्या गोष्टी सांभाळून तेजश्रीने या मालिकेत काम केलं होतं. सहज सुंदर अभिनयाने तेजश्रीने सर्वांचं मन जिंकून घेतलं होतं. ही मालिका संपल्यावर ती कलाविश्वापासून काहीशी दूर झाली. वय कमी असल्याने काही वर्षे तिने मनोरंजन विश्वातून ब्रेक घेतला पण, आता लवकरच ती कलाविश्लात पुन्हा एकदा सक्रिय होणार आहे.

तेजश्रीने सुंदर नऊवारी साडी, हातात कमळाची फुलं, दागिने अशा मराठमोळ्या लूकमध्ये नुकतंच फोटोशूट केलं. यानंतर अभिनेत्रीने मालिकेचं शीर्षकगीत गातानाचा सुंदर व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. अनेकांनी, “आम्ही आजही तुमची मालिका पाहतो” अशा प्रतिक्रिया तेजश्रीच्या व्हिडीओवर दिल्या आहेत.

अभिनेत्री लिहिते, “उंच माझा झोका… फक्त माझ्याच नाही तर प्रत्येक रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी एक आठवण आहे. नऊवारीमध्ये तयार झाल्यावर अर्थातच जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आणि पुन्हा तो काळ डोळ्यासमोर उभा राहिला. मीच ओलांडले मला म्हणत प्रत्येक स्त्री, मुलगी आज मुक्त आणि स्वावलंबी आहे… पुन्हा एकदा रमाबाईंच्या कार्याने मन भरून आलं…रमा ही हाक पुन्हा कानावर पडली आणि अजूनही सगळे किती प्रेम करतात याची खात्री आणि जाणिवेनं मन भरून गेलं. आज इतक्या वर्षांनी सर्वांचं मिळणारं प्रेम मंत्रमुग्ध करणारं आहे. ही देवाची कृपा त्याच्याच चरणी बसले असताना सहज आठवणींना उजाळा द्यायला गाणं ओठी आलं आणि हा क्षण टिपला गेला. सुरात नाही भावात अडकले आणि भावुक झाले इतकंच…”

दरम्यान, ‘उंच माझा झोका’ या मालिकेत छोट्या रमाच्या भूमिकेत तेजश्री झळकली होती. तर, लीपनंतर या मालिकेत रमबाईंच्या भूमिकेसाठी स्पृहा जोशीची एन्ट्री झाली होती.