Chhavaa World TV Premiere With Deleted Scenes : २०२५ या वर्षातला आतापर्यंतचा सर्वाधिक गाजलेला सिनेमा म्हणजे विकी कौशलचा ‘छावा’ हा सिनेमा. घोषणा झाल्यापासूनच अनेकांना या सिनेमाविषयीची उत्सुकता लागून राहिली होती. त्यातच सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई केली.
‘छावा’ सिनेमाचा ट्रेलर समोर आला, तेव्हा यामधील छत्रपती संभाजी महाराज नृत्य करण्याच्या सीनवर अनेकांनी आक्षेप घेतला होता. प्रचंड टीकेनंतर सिनेमातून हा सीन काढून टाकण्यात आला. मात्र, आता सिनेमातून काढून टाकण्यात आलेले म्हणजेच डिलिट केलेले सीन प्रेक्षकांना पाहता येणार आहेत.
‘छावा’ सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर येत्या रविवारी पाहायला मिळणार आहे आणि ‘छावा’चा हा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर डिलीट केलेल्या सीन्ससह प्रेक्षकांना पाहता येणार आहे.
दिव्या दत्ता, दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर, विनीत सिंह कुमार आणि विकी कौशल स्टार गोल्ड राउंडटेबलमध्ये सहभागी झाले होते. या कार्यक्रमाचा एक प्रोमो व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यात ‘छावा’ चित्रपटातील डिलिट केलेल्या सीनबद्दल चर्चा होताना दिसते.
दिव्या दत्ता दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांना विचारतात, “सर, फिल्ममेकिंग हे खूप कठीण काम असतं. कधी काही चांगले सीनसुद्धा काढून टाकावे लागतात; असं तुमच्याबाबतीत कधी घडलंय का?”
यावर लक्ष्मण उतेकर थोडंसं नकारात्मक उत्तर देतात, पण विकी कौशल त्यांना मध्येच म्हणतो, “सर, तो सीन… कलाकारांना माहीत असतं की, त्यांचा कोणता सीन कट करण्यात आला आहे.” यावर दिग्दर्शक त्याला म्हणतात, “मग तूच सांग…”
मग पुढे विकी कौशल म्हणतो, “एक काम करूया का? जे सीन थिएटरमध्ये दाखवले नाहीत, ओटीटीवरही पाहता आले नाहीत, ते आपण स्टार गोल्डच्या प्रेक्षकांना दाखवूया का?” यावर दिव्या दत्ता म्हणते, “दाखवा ना!” आणि प्रोमो इथेच संपतो. पण, यावरून एक गोष्ट स्पष्ट होते, ती म्हणजे ‘छावा’चा टेलिव्हिजन प्रीमियर सिनेमातील डिलिट केलेल्या सीनसह होणार आहे.
दरम्यान, ‘छावा’चा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर येत्या रविवारी म्हणजेच १७ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजता स्टार गोल्ड वाहिनीवर होणार आहे.