Tejashri Pradhan New Serial Vin Doghantali Hi Tutena : ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या नव्या मालिकेतून लोकप्रिय अभिनेत्री तेजश्री प्रधान छोट्या पडद्यावर कमबॅक करण्यासाठी सज्ज झाली आहे. या मालिकेच्या निमित्ताने प्रेक्षकांना तेजश्री प्रधान आणि सुबोध भावे यांची जोडी पहिल्यांदाच टेलिव्हिजनवर झळकताना दिसेल. या मालिकेचं नेमकं कथानक कसं असेल जाणून घेऊयात…
‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकेच्या दोन्ही प्रोमोला सोशल मीडियावर तुफान प्रतिसाद मिळाला आहे. या मालिकेत तेजश्री प्रधान स्वानंदी सरपोतदार ही भूमिका साकारतेय. जबाबदारीने आयुष्य जगणारी, प्रेम आणि लग्न या गोष्टी कायमच मागे टाकून कुटुंबासाठी झटणारी ३५ वर्षीय स्त्री.
तर सुबोध भावे साकारतोय समर राजवाडेची भूमिका, एक यशस्वी व्यावसायिक आणि मनाने भावनिक माणूस, जो आपल्या भावंडांवर आई-वडिलांप्रमाणे प्रेम करतो आणि त्यांचा सांभाळ करतोय. या दोन्ही पात्रांची परिस्थिती भिन्न असूनही कुटुंबासाठी निर्माण झालेलं नातं नंतर प्रेमात कसं रूपांतरित होतं, हे पाहणं हीच या मालिकेची खरी गोडी आहे.
‘या’ अभिनेत्री असतील मालिकेच्या लेखिका…
या मालिकेचं दिग्दर्शन करत आहेत चंद्रकांत गायकवाड, तर लेखनाची जबाबदारी मधुगंधा कुलकर्णी आणि मुग्धा गोडबोले या सांभाळत आहेत. कथेत स्वानंदी आणि समर, आपल्या जबाबदाऱ्यांत इतके गुंतले आहेत की त्यांचं वैयक्तिक आयुष्य मागे पडत जातंय. पण नियती त्यांना एका वळणावर एकत्र आणते. आपल्या भावंडांच्या सुखासाठी हे दोघंही एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय घेतात. समर-स्वानंदीच्या आयुष्यात प्रवेश करतो. जी गोष्ट तडजोड म्हणून सुरू होते, ती हळूहळू समजुतीच्या आणि जिव्हाळ्याच्या नात्यात गुंफली जाणार आहे.
दरम्यान, मालिकेत स्वानंदी म्हणजेच तेजश्रीच्या भावाची भूमिका ‘नवरी मिळे हिटलरला’ फेम अभिनेता राज मोरे साकारणार आहे. तर, सुबोध भावेच्या बहिणीच्या भूमिकेत अभिनेत्री पूर्णिमा डे झळकणार आहे.
‘वीण दोघांतली ही तुटेना’ ही तेजश्री प्रधानची नवीन मालिका ११ ऑगस्टपासून संध्याकाळी ७:३० वाजता प्रसारित केली जाणार आहे.