तेजश्री प्रधानच्या ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकेची सध्या सर्वत्र तुफान चर्चा सुरू आहे. या मालिकेच्या निमित्ताने तेजश्री पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर परतली आहे. तिच्यासह या मालिकेत लोकप्रिय अभिनेता सुबोध भावेने प्रमुख भूमिका साकारली आहे. या मालिकेचं शीर्षक गीत नुकतंच लॉन्च करण्यात आलं. हे गीत कोणी गायलंय जाणून घेऊयात…
‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकेचं शीर्षक गीत लोकप्रिय गायिका सावनी रविंद्र आणि गायक अभिजीत सावंतने गायलं आहे. विशेष म्हणजे मालिकेचं शीर्षक गीत गाण्याची अभिजीतची ही पहिलीच वेळ होती. ‘इंडियन आयडॉल’ या शोमुळे अभिजीत सावंत घराघरांत लोकप्रिय झाला. त्याची “मोहब्बतें लुटाऊंगा”, “सर सुखाची श्रावणी” अशी अनेक गाणी चाहत्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत. नुकतंच गायलेलं मालिकेचं शीर्षक गीत अभिजीतसाठी खूपच खास आहे असं तो सांगतोय.
अभिजीतने त्याच्या करिअरमध्ये पहिल्यांदाच मालिकेसाठी शीर्षक गीत गायलं असून, हे गाणं त्याच्यासाठी खूपच खास आहे. याबद्दल सांगताना अभिजीत सांगतो, “झी मराठी’सारख्या वाहिनीसाठी एखादं शीर्षक गीत गाणं ही माझ्यासाठी खूप मोठी संधी होती. यानिमित्ताने मी पहिल्यांदाच मालिकेचं शीर्षक गीत गायलं. या इंडस्ट्रीत २० वर्षे पूर्ण करताना ही संधी मिळाली याचा मला विशेष आनंद आहे. हे गाणं प्रदर्शित होऊन अगदीच काही दिवस झाले आहेत आणि प्रेक्षकांनी याला दिलेलं भरभरून प्रेम पाहून खूप छान वाटतं. आपण गाण्याला उत्तम न्याय दिला पाहिजे ही जबाबदारी नेहमीच गायकाची असते आणि आज प्रेक्षकांनी या गाण्याला दिलेलं प्रेम पाहता काहीतरी उत्तम झालंय, याचं समाधान मनात आहे. ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेसाठी गायलेल हे गाणं नक्कीच आठवणीत राहील यात शंका नाही”
दरम्यान, ‘वीण दोघांतली ही तुटेना’ ही मालिका ‘झी मराठी’ वाहिनीवर रोज सायंकाळी रात्री ७:३० वाजता प्रसारित केली जाते. यामध्ये तेजश्री आणि सुबोधसह सुलभा आर्या, शर्मिला शिंदे, भारती पाटील, किशोर महाबोले, पूर्णिमा डे, राज मोरे अशा बऱ्याच कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.