Shreyas Talpade Comback On Zee Marathi : ‘झी मराठी’ वाहिनीवर गेल्या काही दिवसांपासून ‘चल भावा सिटीत’ या नव्या रिअॅलिटी शोचे अनेक प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. हा शो ग्रामीण आणि शहरी पार्श्वभूमीतील स्पर्धकांना एकत्र आणणार आहे. ग्रामीण आणि शहरी भागातले स्पर्धक एकमेकांच्या जीवनाचा अनुभव घेतील आणि एकमेकांना आव्हान देतील अशी या कार्यक्रमाची संकल्पना असणार आहे. या शोचा होस्ट नेमका कोण असणार? याबद्दल प्रेक्षकांच्या मनात कमालीची उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोतून याचा उलगडा झालेला आहे.
‘मी येतोय…’ असं कॅप्शन देत ‘झी मराठी’ने नुकतीच एका अभिनेत्याची झलक शेअर केली होती. या व्हिडीओमध्ये अशी एक गोष्ट दिसली, ज्यामुळे शो होस्ट करणारा अभिनेता नेमका कोण असेल याचा अंदाज सर्वांना आधीच आला होता. प्रेक्षकांनी हातातील अंगठ्यावरून श्रेयस तळपदे ‘चल भावा सिटीत’ या शोचा होस्ट असेल असा अंदाज बांधला होता आणि सर्वांचा अंदाज खरा ठरला आहे. श्रेयस तळपदेने ‘चल भावा सिटीत’ या शोच्या होस्टिंगची जबाबदारी स्वीकारली आहे.
‘चल भावा सिटीत’चं शीर्षक गीत नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. “ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहात होतात..तेच घेऊन आलाय अभिनेता श्रेयस तळपदे ‘चल भावा सिटीत’ या भन्नाट कार्यक्रमाचं, नवकोरं शीर्षकगीत…!” असं कॅप्शन देत वाहिनीने हा प्रोमो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या शोच्या निमित्ताने तब्बल दोन वर्षांनी श्रेयस टेलिव्हिजनवर कमबॅक करणार आहे. यापूर्वी त्याने ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेत काम केलं होतं.
‘या’ स्टार अभिनेत्री सहभागी होणार…
‘झी मराठी’च्या ‘चल भावा सिटीत’ या शोमध्ये जोआना अश्का, भाग्यश्री मुरकर, अक्षता उकिरडे, गायत्री दातार, अनुश्री माने या अभिनेत्री सहभागी होणार आहे. हा शो येत्या १५ मार्चपासून दररोज रात्री ९:३० वाजता प्रक्षेपित केला जाणार आहे. ‘चल भावा सिटीत’ हा कार्यक्रम प्रेक्षकांना ग्रामीण महाराष्ट्राची समृद्धी आणि संस्कृती यांचं दर्शन घडवेल. सिटीत गाव गाजणार म्हणजे नक्की काय होणार हे प्रेक्षकांसमोर हळुहळू उलगडत जाईल.
© IE Online Media Services (P) Ltd