Actress Ketaki Kulkarni New Car : आपलं हक्काचं घर आणि गाडी असावी असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. यंदाच्या वर्षी मराठी इंडस्ट्रीमधील बऱ्याच कलाकारांनी आलिशान गाड्या खरेदी केल्याचं पाहायला मिळालं. नवीन कार घेणाऱ्या कलाकारांच्या यादीत आता आणखी एका अभिनेत्रीचं नाव जोडलं गेलं आहे. ‘झी मराठी’च्या नव्या मालिकेत झळकणाऱ्या लोकप्रिय अभिनेत्रीने नुकतीच आलिशान कार घेतल्याची आनंदाची बातमी चाहत्यांबरोबर शेअर केली आहे.

विशेष म्हणजे ही अभिनेत्री अवघ्या २० वर्षांची आहे. येत्या २२ जुलैला ही अभिनेत्री तिचा २० वा वाढदिवस साजरा करणार आहे. वाढदिवस साजरा करण्याआधीच तिने स्वत:ला नव्या गाडीच्या रुपात ‘सेल्फ गिप्ट’ दिल्याचं पोस्टमध्ये नमूद केलं आहे. नवीन गाडी घेणारी ही लोकप्रिय अभिनेत्री आहे केतकी कुलकर्णी. मराठीसह हिंदी कलाविश्वात आजवर तिने बरंच काम केलेलं आहे. याशिवाय केतकी बॉलीवूड चित्रपटात देखील झळकली आहे.

केतकीने २० व्या वाढदिवसाचं गिफ्ट म्हणून स्वकष्टाने आलिशान गाडी खरेदी केली आहे. अभिनेत्री तिच्या आई-बाबांसह नवीन गाडी घेण्यासाठी पोहोचली होती. यावेळी तिने केक कापून आनंद व्यक्त केला. तर, अभिनेत्रीच्या आईने यावेळी गाडीची पूजा केल्याचं व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.

केतकी कुलकर्णी पोस्ट शेअर करत लिहिते, “ही नवीन गाडी म्हणजे माझ्या २० व्या वाढदिवसाचं अ‍ॅडव्हान्स गिफ्ट आहे. ही माझी पहिली गाडी आहे…महत्त्वाचं म्हणजे ही कार मला कोणीही गिफ्ट दिलेली नाही. मी स्वत: संयम बाळगून, नियोजन व मेहनत करून आणि स्वत:वर विश्वास ठेवून ही गाडी घेतलीये. आई-बाबा, दादा, आजी तुम्ही सगळ्यांनी मला कायम पाठिंबा दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार…” या पोस्टमध्ये केतकीने भावुक झाल्याचा इमोजी देखील दिला आहे.

केतकीने Maruti Suzuki XL6 ही गाडी खरेदी केली आहे. मुंबईत या गाडीची किंमत जवळपास ११.८४ लाख ते १४.८४ ( एक्स-शोरूम ) लाखांपर्यंत असल्याचं वृत्त फायनान्शियल एक्सप्रेसने दिलं आहे. अभिनेत्रीच्या चाहत्यांनी तिच्या नव्या गाडीच्या पोस्टवर कमेंट्सचा वर्षाव करत तिचं भरभरून कौतुक केलं आहे.

अभिनेत्रीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं, तर केतकी कुलकर्णी सध्या ‘झी मराठी’च्या ‘कमळी’ मालिकेत झळकत आहे. यामध्ये ती अनिका ही खलनायिकेची भूमिका साकारत आहे. ही अनिका कमळीच्या वाटेतील सर्वात मोठं वादळ असते…केतकीचं पात्र निगेटिव्ह असलं तरी तिच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.