Zee Marathi Lakhat Ek Amcha Dada Serial Off Air : ‘झी मराठी’ वाहिनीवर या आठवड्यात ११ आणि १२ ऑक्टोबरला पुरस्कार सोहळा पार पडणार आहे. यंदा या सोहळ्यात एका खास मालिकेचा सन्मान करण्यात येणार आहे. ही मालिका म्हणजे ‘लाखात एक आमचा दादा’. यावर्षी नितीश चव्हाणची मुख्य भूमिका असलेल्या या मालिकेला पुरस्कार सोहळ्यात कोणतंही नामांकन मिळालं नव्हतं. त्यामुळे ‘लाखात एक आमचा दादा’ ही मालिका संपणार हा अंदाज प्रेक्षकांनी आधीच व्यक्त केला होता आणि तो अंदाज अखेर खरा ठरला.
‘लाखात एक आमचा दादा’ या मालिकेचा शेवटचा भाग ४ ऑक्टोबरला प्रसारित झाला. जवळपास १५ महिने रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवल्यावर या मालिकेने सर्वांचा निरोप घेतला. सूर्या दादा व त्याच्या बहिणींचा यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात खास ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला. या ट्रॉफीवर मध्ये सूर्या दादा आणि बाजूला त्याच्या लाडक्या बहिणींचा फोटो असल्याचं पाहायला मिळत आहे.
‘लाखात एक आमचा दादा’ या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित झाल्यावर ट्रॉफीच्या फोटोसह अभिनेत्री ईशा संजयने सोशल मीडियावर भावुक पत्र शेअर केलं आहे.
अभिनेत्री ईशा संजयचं पत्र
मालिकेचा शेवटचा भाग शूट झाला आणि तेव्हाच स्वत:साठी आपला शो संपला, चला आता आपल्या-आपल्या घरी असं समजावलं. खूप इमोशनल असल्यामुळे जास्तीत जास्त लवकर स्वत:ला गोष्टींपासून लांब करून टाकायचं म्हणजे कमी त्रास होतो असा एक गोड गैरसमज माझा! मी लांब पळायचा प्रयत्न केला तरी त्या गोष्टींचं अस्तित्व नष्ट होतं असं नाही होत ना, त्या येतातच समोर. आपल्याला त्या अनुभवाव्या लागतातच. तसंच काही झालं. इतर मित्रांच्या स्टोरीज, पोस्ट वाचून परत ते दिवस आठवले आणि शेवटी परत डोळ्यात पाणी आलंच! नाही पळू शकले. म्हणून मन मोकळ करायचा कृतज्ञ होण्याचा हा प्रयत्न.
मालिकेने मला ओळख दिली, प्रेम दिलं, आत्मविश्वास दिला, खूप जिवाभावाचे मित्र मिळाले. राजूचा वाडा ईशासाठी हक्काचं घर होतं आणि त्यामागचं कारण म्हणजे किरण दळवी सर, शिवराज नांगरे पाटील, सागर, मनिषा कदम हे लोक आणि त्यांची टीम! त्यांनी मला ती जागा परकी वाटू दिली नाही. हे सगळे होते म्हणून मी ते पात्र म्हणून कशी असेन आणि दिसेन याची कधीच काळजी वाटली नाही, कारण तेवढा एकमेकांवर विश्वास होता. घरापासून लांब होते तरी दुसरं घर मिळालं होतं, इथून पुढे खूप सेट मिळतील पण घर नाही ही खात्री आहे!
मला माझ्या सहकलाकारांबद्दल विशेष प्रेम आहे हे आतापर्यंत सगळ्या जगाला कळालं आहेच! thank you किंवा sorry म्हणून मला त्यांना परक करायचं नाही. नितीश, जुई, कोमल, समृद्धी, महेश, स्वप्नील, अतुल, शुभम तुम्ही मला खूप सहन केलंत आणि आयुष्यभर सहन करत रहाल अशी आशा करते. love you guys. झी मराठी, श्वेता शिंदे, संजय खांबे, वज्र प्रोडक्शनने मला संधी दिली. प्राची व प्राजक्ता यांनी विश्वास दाखवला त्यासाठी खूप खूप आभार… असंच प्रेम असुदे, भेटू नवीन भूमिकेत.
सप्रेम, ईशा.फोटो कॅप्शन
१. कमाई
२. पहिला सीन
३. शेवटचा सीन
४. खास प्रेम
५. माझं काळीज
दरम्यान, ईशाच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी सुद्धा भावनिक कमेंट्स केल्या आहेत. याशिवाय ईशाला आगामी काळात आणखी नवनवीन प्रोजेक्ट्समध्ये पाहायला आवडेल अशी इच्छा देखील तिच्या चाहत्यांनी व्यक्त केली आहे.