Lakshmi Niwas Promo : ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत गेल्या काही दिवसांपासून जान्हवीसमोर जयंतचा खोटेपणा उघड झाल्याचा सीक्वेन्स चालू आहे. नवऱ्याने आपल्या आजीवर हल्ला केल्याने ती कोमात गेलीये, याशिवाय वेंकीला विहिरीत ढकलणारा सुद्धा जयंतच होता हे सत्य जान्हवीला समजतं. यामुळे तिच्या पायाखालची जमीन सरकते. आता काही करून जयंतला धडा शिकवायचा असा निर्णय जान्हवी घेणार आहे. पण, या सगळ्याचा त्रास तिला आपल्या आई-बाबांना द्यायचा नसतो.

जान्हवी जयंतबरोबर मिळून एक व्हेकेशन प्लॅन करणार आहे. ती गरोदर सुद्धा असते, त्यामुळे जयंत कितीही विकृत असला तरीही बायकोचे सगळे हट्ट पुरवताना दिसतो. जान्हवी आणि जयंत आता एका क्रुझवर जाणार आहेत. अनेक दिवसांनी फिरायला गेल्यामुळे जानू प्रचंड आनंदी असल्याचं जयंतला दाखवते. मात्र पुढे, अचानक ती रौद्ररूप धारण करून नवऱ्याला सगळ्या चुकांबद्दल जाब विचारते. ती जयंतला खुर्चीवर बांधून ठेवते आणि त्याच्यावर पिस्तुल रोखते. यावर जयंत म्हणतो, “जानू हा सगळा काय वेडेपणा आहे?”

जयंतच्या चुकांना वैतागलेली जान्हवी म्हणते, “वेडेपणा….अरे मी कधीतरी तुझ्यावर प्रेम केलं हे जगाला काय…स्वत:ला सांगायची लाज वाटते. बास झालं तुझं…तुझ्यामुळे माझी आजी कोमात गेली, वेंकी दादाला पण तुच विहिरीत ढकललं होतंस. इथे भेटलास पुढे कुठेच भेटू नकोस गूडबाय मिस्टर जयंत कानिटकर” यानंतर जानू समुद्रात उडी मारून जीव देते. जयंतपासून कायमची सुटका करून घेण्यासाठी जानूने आत्महत्येचा मार्ग स्वीकारला.

आता खरंच जान्हवीचा जीव जाणार की, जयंत तिला वाचवणार हे आगामी भागात पाहायला मिळेल. मात्र, या सगळ्यात जान्हवीच्या मदतीला विश्वा येईल अशी दाट शक्यता आहे.

‘लक्ष्मी निवास’मध्ये येणार दोन मोठे ट्विस्ट

एकीकडे जान्हवी जयंतपासून कायमची सुटका करून घेणार आहे. तर, दुसरीकडे भावना-सिद्धूच्या नात्याला आता खऱ्या अर्थाने सुरुवात होणार आहे. कारण, भावना सिद्धूसमोर प्रेमाची कबुली देणार आहे. सिद्धूला त्याच्याच स्टाइलमध्ये भावना प्रपोज करते. त्यामुळे आता पुढे जाऊन भावना आणि जान्हवीचं आयुष्य काय वळण घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, ‘लक्ष्मी निवास’चे हे विशेष भाग १५ ते २० ऑक्टोबरदरम्यान प्रसारित करण्यात येणार आहेत. प्रेक्षकांनी सुद्धा या सिनेमॅटिक प्रोमोवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.