Savalyachi Janu Savali Upcoming Twist:’सावळ्याची जणू सावली’ मालिकेत अनेक ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. सावली व सारंग यांच्यातील केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडू लागल्याचे दिसत आहे.
सारंग व सावलीच्या मध्ये येऊ पाहणारी अस्मी आता त्यांच्या आयुष्यातून निघून गेली आहे. मात्र, आता मेहेंदळे कुटुंबात तारा सोहमशी लग्न करून आली आहे. तारा सावलीला सतत त्रास देत असल्याचे दिसत आहे. कधी ती तिचा स्वयंपाक खराब करण्याचा प्रयत्न करते, कधी तिला इजा व्हावी म्हणून खिळे टाकते, तर कधी तिला धमकी देताना दिसते.
मालिकेत दाखविल्याप्रमाणे सावली तारासाठी गाणे गाते. गरीब कुटुंबातील सावलीचा आवाज चांगले असल्याचे ओळखून ताराची आई भैरवी वझे तिच्या आवाजाचा वापर करायचा ठरवते. तारासाठी सावली गाणे गात राहील, तिचा आवाज भैरवीकडे गहाण राहील आणि त्या बदल्यात भैरवी सावलीच्या कुटुंबाला आर्थिक मदत करेल, असे भैरवीने करार केला होता. अनेकदा भैरवी सावलीला त्रास देते. जगासमोर तारा लोकप्रिय गायिका आहे, पण खरेतर तो आवाज सावलीचा आहे; हे रहस्य मोजक्या लोकांना माहीत आहे.
तारचे सत्य उघडकीस येणार का?
आता ‘सावळ्याची जणू सावली‘ मालिकेचा एक प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, तारा कोणाशीतरी फोनवर बोलत आहे. ती म्हणते, कोणाला शंका यायला नाही पाहिजे की मी नाही तर सावली गात आहे. कळलं? म्हणून ती मोठ्याने विचारते. तितक्यात तिथे ऐश्वर्या आलेली दिसते, ते पाहून ताराला धक्का बसतो.
प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की सावलीसह सारंग तिच्या माहेरी आला आहे. सावलीचा भाऊ आजारी आहे. ते दोघेही सखदेवच्या शेजारी बसले आहेत. तितक्यात सावलीला फोन येतो.
सारंग सावलीला विचारतो की फोन कोणाचा होता? सावली म्हणते, “तारा मॅडमचा”, सारंग विचारतो, काय म्हणाली, “गाण्याचा कार्यक्रम आहे, त्यामुळे त्यांनी मला बोलवलं आहे.” त्यावर सारंग म्हणतो, “जायची काही गरज नाही.” सावली त्याला म्हणते की मला जावं लागेल, माझं ते काम आहे. त्यावर सावलीला सारंग विचारतो की तू गेली नाहीस तर ती गाणं म्हणू शकणार नाही का? त्यावर सावलीच्या वहिनी पटकन ‘नाही म्हणू शकत’ असे म्हणते. त्यावर सारंग प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे पाहत आहे.
हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “ताराचं सत्य उघडकीस येईल का?”, अशी कॅप्शन दिली आहे. आता मालिकेत पुढे काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.