श्रुती कदम

भारताच्या सुरक्षिततेची शपथ घेतलेला सैनिक आपले कर्तव्य पूर्ण करण्यासाठी वेळप्रसंगी आपल्या प्राणांची आहुती देऊ शकतो आणि शत्रूचा जीवही घेऊ शकतो. भारतीय सैनिकांच्या शौर्याची गाथा सांगणारा ‘योद्धा’ हा अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा याचा आगामी चित्रपट १५ मार्च रोजी संपूर्ण भारतात प्रदर्शित होणार आहे. एका प्रवासी विमानाचे अपहरण करण्यात आल्यानंतर त्यातील प्रवाशांना सुखरूप बाहेर काढत अपहरण करणाऱ्या दहशतवाद्यांना अद्दल घडवणाऱ्या सैनिकाची कथा या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. करण जोहर निर्मित या चित्रपटाचं दिग्दर्शन सागर आंब्रे आणि पुष्कर ओझा यांनी केलं असून राशी खन्ना, दिशा पटानी आणि रोनीत रॉय यांच्या यात प्रमुख भूमिका आहेत.  या चित्रपटाच्या ट्रेलर प्रदर्शनाच्या निमित्ताने अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा याने प्रसिद्धीमाध्यमांशी मनमोकळय़ा गप्पा मारल्या.

हेही वाचा >>>चेक रिपब्लिकची क्रिस्टिना पिस्कोव्हा ठरली ‘मिस वर्ल्ड २०२४’, भारताची सिनी शेट्टी टॉप-४च्या शर्यतीतूनच झाली बाहेर

या चित्रपटाबद्दल आणि आपल्या पात्राबद्दल बोलताना सिद्धार्थ म्हणाला, ‘योद्धा या चित्रपटाचा ट्रेलर आम्ही ३७ हजार फूट उंचीवर विमानामध्ये प्रदर्शित केला. विमान हवेत उडत असताना अपहरण करण्यात आले तर त्यातील प्रवाशांच्या मनात उमटणारी भीती कशी असते हे या ट्रेलरच्या माध्यमातून आम्हाला मांडायचे होते. हा चित्रपट एका सैनिकावर आधारित आहे, ज्याचं त्याच्या देशावर फार प्रेम आहे आणि त्या देशाच्या आणि देशातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी तो काहीही करू शकतो’. 

 ‘कोणताही चित्रपट करताना त्यातील पात्र आपलंसं वाटणं गरजेचं असतं. ‘योद्धा’ या चित्रपटातील अरुण या तरुणाची गोष्ट मला माझ्या गोष्टीसारखी वाटली. त्याचं देशासाठीचं प्रेम, त्याचा परिवार, त्याचं कर्तव्य या सगळय़ाची सांगड या चित्रपटात उत्तमरीत्या घालण्यात आली आहे’, असं सांगणाऱ्या सिद्धार्थने या चित्रपटासाठी त्याला खास प्रशिक्षण देण्यात आलं होतं. शिवाय, वेगवेगळे स्टंट शिकवण्यात आले. ते शिकून घेण्यासाठी फार मेहनत घ्यावी लागली, अशी माहिती दिली. या मेहनतीचं फळ प्रेक्षकांकडून नक्की मिळेल, असा विश्वासही त्याने व्यक्त केला.

 ‘योद्धा’ हा दिग्दर्शक सागर आंब्रे आणि पुष्कर ओझा यांचा पहिलाच चित्रपट आहे. त्यांच्याबरोबर काम करण्याच्या अनुभवाबद्दल सिद्धार्थ  म्हणतो, ‘आपल्या हिंदी चित्रपटसृष्टीला सागर आणि पुष्कर यांच्यासारख्या अ‍ॅक्शन चित्रपट दिग्दर्शित करणाऱ्या दिग्दर्शकांची गरज आहे. या चित्रपटातील प्रत्येक अ‍ॅक्शन ही वेगवेगळय़ा प्रकारे चित्रित करण्यात आली आहे. यासाठी फार आधीपासून त्या दोघांनी तयारी केली होती. सागर आणि पुष्कर यांच्यासोबत काम करताना मला हा त्यांचा पहिला चित्रपट आहे असं कधीच जाणवलं नाही, कारण प्रत्येक दृश्य चित्रित करताना हे दृश्य या चित्रपटात का आहे? याविषयीची स्पष्टता आम्हालाही असायची. या चित्रपटासाठीची पूर्वतयारी त्यांनी अचूकरीत्या केली होती. त्यामुळे कधीच आम्हाला चित्रीकरण करताना ठरवलेल्या नियोजनापेक्षा अधिक उशीर झाला नाही. अगदी वेळेत चित्रीकरण पूर्ण झाले’.

भारतीय सैनिकांकडून एखादा गुण आत्मसात करायचा झाला तर तो कोणता असेल? याचे उत्तर देताना अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा म्हणाला, ‘आपला देश हा शहिदांचा देश आहे. आपल्या देशासाठी अनेक सैनिकांनी त्यांच्या प्राणांची आहुती दिली आहे. या देशाची सुरक्षा करणाऱ्या प्रत्येक सैनिकाकडून जर भारतीयाने कोणता गुण आत्मसात करायचा असेल तर, स्वत:आधी देशाचा विचार करण्याची वृत्ती आत्मसात केली पाहिजे. कारण आपल्या देशातील सैनिकांपासून ते पोलिसांपर्यंत सगळेच संकटाच्या काळात आधी अन्य नागरिकांचा विचार करतात, त्यामुळे जर आपल्यासारख्या सामान्य माणसाने हा गुण आत्मसात केला तर नक्कीच या देशात एकी वाढेल’. याआधीही सिद्धार्थने सैनिकाची भूमिका असलेले चित्रपट केले आहेत. ‘शेरशाहा’ चित्रपटातील भूमिकेसाठी त्याचे कोण कौतुक झाले. अशीच ‘योद्धा’ चित्रपटातील त्याची भूमिकाही प्रेक्षकांना पसंत पडेल, असा विश्वास त्याने व्यक्त केला.