This South Indian Actor Died On Set : भारतीय सिनेसृष्टीत असे अनेक अभिनेते आहेत ज्यांनी त्यांच्या कारकिर्दीत इतकी कामं केली आहेत की ते हयात नसतानाही त्यांच्या नावाचा उल्लेख केला जातो. आजही त्यांच्या कामाचं कौतुक होतं आणि त्यांनी इंडस्ट्रीसाठी काही तरी केलेलं असतं. यापैकीच एक नाव म्हणजे दाक्षिणात्य अभिनेते जयन.

जयन यांचा जन्म २५ जुलै १९३९ मध्ये झाला होता. दी इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार त्यांनी १५ वर्ष भारतीय नौदलात मास्टर चिफ पेटी म्हणून काम केलं होतं. त्यांचं मूळ नाव क्रिशन्न नायर असं आहे. ते मल्याळी अभिनेते जयाभराती यांचे चुलत भाऊ होते. जयन यांनी १९७४ मध्ये इंडस्ट्रीत पदार्पण केलं होतं. यानंतर त्यांनी अनेक छोटे मोठे रोल केले. १९७६ मध्ये आलेल्या ‘पंचनामी’ चित्रपटात काम करत त्यांनी सगळ्यांचं लक्ष वेधलं.

जयन यांनी मल्याळम चित्रपटसृष्टीत स्वत:चं स्थान निर्माण केलं. ‘ओरमाकल मेरीक्कुमो’, ‘मदनोलसावम’, ‘आदिमक्काचवदम’ आणि ‘थाचोली अंबू’ ते ‘जयक्कानाय जानीचवान’, ‘मुक्कुवाने स्नेहिचा भूतम’, ‘कडथनाट्टू माक्कम’ आणि ‘लिसा पर्यंत’, अशा विविध चित्रपटांत काम केलं आहे.

जयन यांनी पुढे अ‍ॅक्शन हिरो म्हणून स्वत:ची ओळख निर्माण केली. त्यांच्यासाठी अ‍ॅक्शन चित्रपट लिहिले गेले. त्यांनी त्यांच्या अ‍ॅक्शन, स्टंटमधून अनेकांचं लक्ष वेधलं. त्याचवेळी त्यांच्या लक्षवेधी अभिनयासाठीही त्यांचं कौतुक व्हायचं. पुढे काही काळात ते मल्याळी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेते झाले. त्यांना माचो मॅन म्हणून लोक ओळखू लागले. उल्लेख केलेल्या माध्यमाच्या वृत्तानुसार जयन १९८० दरम्यान प्रसिद्धीझोतात आले. यादरम्यान त्यांनी अनेक हिट चित्रपट दिले. पण, याचवेळी त्यांच्याबरोबर मोठी घटना घडली.

अ‍ॅक्शन, स्टंट यांसाठी प्रसिद्ध असलेल्या जयन यांचा ‘कोलीलाक्कम’ चित्रपटाच्या सेटवर स्टंट करताना मृत्यू झाला. ते स्वत: सगळे स्टंट करायचे. ‘कोलीलाक्कम’ या चित्रपटात अनेक लोकप्रिय कलाकार होते. यामध्ये एक जबरदस्त फायटिंग सीनचं चित्रीकरण सुरू असतानाच १६ नोव्हेंबर १९८० मध्ये चालू हॅलिकॉप्टरवर चित्रपटातील खलनायकाबरोबर सीन करत असताना हॅलिकॉप्टर क्रॅश झालं आणि ‘दी न्यूज मिनिटच्या वृत्तानु’सार त्याचवेळी पायलटने त्यातून बाहेर उडी मारली, खलनायकाची भूमिका साकारत असलेला अभिनेता बालन नायरलाही बाहेर ढकलण्यात आलं, त्यालाही गंभीर दुखापत झाली, परंतु त्यावेळी जयन मात्र खाली पडल्यामुळे त्यांच्या डोक्याला मार लागला, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं, परंतु उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं.

जयन यांचा मृत्यू झाला त्यावेळी ते यशाच्या शिखरावर होते, तर आजही त्यांच्या निधनाच्या ४५ वर्षांनंतरही मल्याळी सिनेमे पाहणारे अनेक प्रेक्षक त्यांना ओळखतात. जयन यांनी फक्त ६ वर्ष काम केलं, परंतु त्यांनी त्या काळात ११६ चित्रपटांत काम केलं. त्यावेळी त्यांची तरुणांमध्ये खूप क्रेझ होती आणि मल्याळी सिनेमाचा चेहरा म्हणूनही त्यांच्याकडे पाहिलं जायचं.