सध्या सोनी वाहिनीवरील ‘द कपिल शर्मा’ शो चर्चेत आहे. छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय शो म्हणून याकडे पाहिले जाते. या शोचा सूत्रसंचालक कपिल शर्मा याने त्याच्या विनोदाने अनेकांच्या मनात घर केले आहे. शो मधील कपिल शर्मा आणि त्याच्या इतर सहकाऱ्यांचे विनोद चाहत्यांच्या चांगल्याच पसंतीला उतरत असल्याचे पाहायला मिळत आहे. शोमध्ये येणारे कलाकार हे शोला आणखी रंजक करतात. शोमध्ये कपिल शर्माने नवजोत सिद्धूबाबत एक खुलासा केला आहे.

काही दिवसांपूर्वी ‘द कपिल शर्मा’ शोमध्ये ‘पागलपंती’ चित्रपटाच्या संपूर्ण टीमने हजेरी लावली. अभिनेता अनिल कपूर, अरशद वारसी, जॉन अब्राहम आणि उर्वशी रौतेला हे कलाकार चित्रपटाच्या प्रमोशनसाठी शोमध्ये पोहोचले होते. दरम्यान कपिल शर्मा आणि इतर कलाकारांनी मजामस्ती केल्याचे पाहायला मिळाले. पण सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते उर्वशी आणि कपिलच्या गप्पांनी. उर्वशी शोमध्ये आल्यामुळे कपिल शर्मा आनंदी झाल्याचे अनिल कपूर म्हणतो. त्यावर कपिलने ‘उर्वशीने तू माझ्या तपस्येचा भंग केला आहेस. तुला माहित आहे का गेल्या वेळेस जेव्हा तु आली होतीस तेव्हा सिद्धू पण तुझ्यासोबत निघून गेले होते आणि ते आज पर्यंत परत आलेच नाहीत’ असे मजेशीर अंदाजात उत्तर दिले आहे. कपिलचे उत्तर ऐकताच सर्वत्र हास्याची लाट पसरल्याचे पाहायला मिळते.

सध्या ‘पागलपंती’ चित्रपटाचे चित्रीकरण सुरु असून हा चित्रपट ६ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या निमित्ताने जॉन आणि इलियाना पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करणार आहे. हा एक रोमँटिक कॉमेडी चित्रपट असल्याचे म्हटले जात आहे. या चित्रपटात जॉन आणि इलियानाव्यतिरिक्त अनिल कपूर, अर्शद वारसी, क्रिती खरबंदा, उर्वशी रौतेला, सौरभ शुक्ला, पुलकित सम्राट हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत.