आलिया भट्टचा ‘डार्लिंग्ज’ हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला. बद्रू हे प्रमुख पात्र साकारण्यासोबतच तिने या चित्रपटाच्या निर्मितीचीही जबाबदारी उचलली. घरगुती हिंसा या अत्यंत संवेदनशील विषयावर आधारलेल्या या चित्रपटामध्ये आलियासह शेफाली शहा, विजय वर्मा, रोशन मॅथ्यू अशा तगड्या कलाकारांनी काम केले आहे. या चित्रपटामध्ये विजय वर्माने आलियाने साकारलेल्या बद्रूच्या नवऱ्याची म्हणजेच हमजाची भूमिका केली आहे. डार्लिंग्जमध्ये ग्रे शेड असलेली व्यक्तिरेखा साकारल्यामुळे विजयचे कौतुक होत आहे.
विजय वर्माने ‘गली बॉय’ चित्रपटामध्ये मोईन हे महत्त्वपूर्ण पात्र साकारले होते. या पात्रामुळे त्याच्या लोकप्रियतेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. गली बॉयमध्ये मुख्य भूमिकेत असलेल्या रणवीर सिंगवर तो बऱ्याच सीन्समध्ये वरचढ ठरला. अमिताभ बच्चन, तापसी पन्नू यांच्या ‘पिंक’ या चित्रपटात त्याने सहाय्यक व्यक्तिरेखा केली आहे. याशिवाय विजय मान्सून शूटआऊट, मंटो, सुपर ३०, घोस्ट स्टोरीज या चित्रपटांमध्येही झळकला आहे. त्याने शी, मिर्झापूर या वेब सीरिजमध्ये काम केले आहे.
डार्लिंग्ज चित्रपटाच्या निमित्ताने नेटफ्लिक्सने अनेक कार्यक्रम आयोजित केले होते. नेटफ्लिक्स इंडियाद्वारे नुकताच ‘रोस्ट ऑफ विजय वर्मा’ हा २६ मिनिटांचा व्हिडीओ यूट्यूब चॅनलवर पोस्ट केला गेला. या रोस्टमध्ये झाकीर खान, वरुण ठाकूर, श्रीजा चतुर्वेदी असे बरेचसे स्टॅंडअप कॉमेडीयन्स सहभागी झाले होते. उपस्थित सर्व कॉमेडीयन्सकडून रोस्ट झाल्यानंतर विजय वर्मा माईकजवळ गेला आणि त्याने सर्वांना रोस्ट करायला सुरुवात केली. तेव्हा माईकसमोर बोलताना त्याने डार्लिंग्ज चित्रपटाच्या निर्मात्यांना देखील अप्रत्यक्षपणे रोस्ट केले. तो म्हणाला, “तुम्ही डार्लिंग्ज पाहिला असेलच. त्या चित्रपटाच्या पोस्टर्सवर माझा चेहरा तुम्हाला आढळणार नाही. किंवा माझा चेहरा तुम्हाला पोस्टरच्या एका कोपऱ्यात दिसत असेल. पण चित्रपट सुरू असताना हाच चेहरा सर्वांच्या लक्षात राहतो. ते लोक मला स्टार समजत नाही. पण चित्रपटासाठी लागणारा एक्स्ट्रा स्टार मिळवण्यासाठी ते मला त्यांच्या चित्रपटात घेतात.”
आणखी वाचा – रजनीकांत यांना पाहताक्षणी ऐश्वर्या रायने केलं असं काही, व्हिडीओ व्हायरल
विजयने नाटकांच्या माध्यमातून अभिनय करायला सुरुवात केली. त्याने पुण्यातील एफटीआयआय येथून अभिनयाचे शिक्षण घेतले आहे. विजयने एमसीए या तेलुगू चित्रपटामध्येही काम केले आहे. या चित्रपटामध्ये त्याने शिवा हे पात्र साकारले होते.