‘खतरों के खिलाडी’ मधील सर्व स्पर्धक केपटाउनमधून आपल्या घरी परतले असले तरी ते एकमेकांची साथ मात्र विसरले नाहीत. म्हणूनच सध्या या शो मधील स्पर्धक आपआपल्या सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे पूर्वीचे फोटोज शेअर करत आठवणी काढताना दिसून येत आहेत. त्यांच्या फोटोंना शेअर करत काही जण एकमेकांमधली बॉण्डिंग दाखवत आहेत, तर काही जण त्यांच्यां फोटोंना पाहून लिंक्सअपचा अंदाज लावताना दिसून येत आहेत. गेल्या काही दिवसांपासून याच शो मधील स्पर्धक विशाल आदित्य सिंह आणि सना मकबूल यांच्यातील नात्याबद्दल बरीच चर्चा सुरूय.

दोघांच्या फोटोवर निक्की तांबोळी म्हणाली, “हॅपी मॅरिड लाइफ”

सना मकबूल हिने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर विशाल आदित्य सिंहसोबतचा एक फोटो शेअर केला होता. हा फोटो शेअर करताना ती विशाल आदित्य सिंहची फॅन असल्याचं सांगितलं. इतकंच नव्हे तर तिने विशाल आदित्य सिंहला ‘अल्ट्रा लिजेंड’ म्हटलंय. सनाने हा फोटो शेअर केल्यानंतर तिच्या मित्र-मैत्रिणींनी दोघांना एकमेकांच्या नावाने चिडवणं सुरू केलं. निक्की तांबोळीने तर त्यांच्या फोटोंवर ‘हॅपी मॅरिड लाइफ’ असं म्हटलंय. आतापर्यंत विशाल आणि सनाच्या नात्याबद्दल त्यांचे फॅन्स काही तरी सुरू असल्याचा अंदाज लावत होते. पण निक्की तांबोळीच्या या कमेंटमुळे हा अंदाज खात्रीमध्ये बदललाय.

याबद्दल एका माध्यमाशी बोलताना सनाने म्हटलं, “ते तर माझे मित्र-मैत्रिणी आहेत…ते माझी मस्करी करत होते…निक्कीच्या कमेंटमुळे सगळा गोंधळ उडालाय…आमच्या सर्वांमध्ये निक्की थोडी मस्तीखोर आहे…तसं तर विशालने सुद्धा निक्कीला उत्तर दिलंय…चल ठीकेय आम्ही लग्न केलं…पण मग तू का नाही आलीस लग्नाला? हे आमच्या मित्र-मैत्रिणींमधल्या मस्करीची गोष्ट आहे….आम्ही नेहमीच एकमेकांची मस्करी करत असतो.”

आम्ही दोघेही सिंगल आहोत…मग लोक बोलणारंच ना…

यापुढे बोलताना सना म्हणाली, “आम्ही काही चुकीचं तर वागत नाही आहोत ना…आम्हाला फरक नाही पडत…आम्ही काहीच चुकीचं करत नाही…मी अनेकदा सांगितलंय की शो दरम्यान मी विशालची फॅन झाली होती…आणि म्हणून ते मी कॅप्शनमध्ये लिहिलंय…आम्ही दोघेही सिंगल आहोत, मग लोक अशा चर्चा करणारंच.”

 

आईने फोन करून विचारलं, “हे काय आहे?”

माध्यमाशी बोलताना सना म्हणाली, “जेव्हा सगळ्यात आधी विशालचा फोटो शेअर केला आणि दोघांमधला संवाद वाढू लागला, हे कळल्यानंतर माझ्या आईने ताबडतोब मला कॉल केला आणि विचारलं, “हे काय आहे? तुमच्या दोघांमध्ये हे काय सुरूये?” मुळात माझं यापूर्वी कुणाशी असं नातं तयार नाही झालं. मी माझ्या आईला म्हणाली, “शांत हो आई…असं काहीच होणार नाही.”