X
X

सेना-मनसेतलं पोस्टरवॉर शिगेला, राम मंदिराच्या मुद्द्यावरुन मनसेची सेनेवर बोचरी टीका

READ IN APP

कलानगर भागात मनसेने ही पोस्टर लावल्याचं कळतंय

महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना या दोन पक्षांमधलं पोस्टरवॉर सध्या चांगलंच शिगेला पोहचलं आहे. शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याला झालेल्या सभेत, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राम मंदीराच्या मुद्द्यावर शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली. यानंतर मनसेने शिवसेना भवनासमोर, शिवसेनेला अयोध्या वारीला शुभेच्छा देणारं खोचक पोस्टर लावलं. यामध्ये महाराष्ट्रातल्या मुलभूत प्रश्नांवर सेनेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत मनसेने जोरदार टीका केली.

अवश्य वाचा – अयोध्यावारीसाठी उद्धव ठाकरेंना ‘मनसे’ शुभेच्छा पण….

मनसेच्या या टीकेला शिवसेनेनेही, चोख प्रत्युत्तर दिलं. राहत्या वॉर्डात निवडून येण्याचे वांदे, अशा आशयाचं पोस्टर लावत शिवसेनेने मनसेला टोला लगावला. उद्धव ठाकरे यांनीही शिर्डी येथील जाहीर सभेत लाचारी आपल्या रक्तात नसून, मी सत्ता आहे म्हणून शेपटू हलवणार नाही असं वक्तव्य केलं. उद्धव ठाकरेंच्या याच भूमिकेला मनसेने आपल्या पोस्टरमध्ये लक्ष्य केलं आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना मोदी सरकारच्या पायाला मिठी मारुन बसलेलं दाखवून, दुसऱ्या बाजूला हताश शिवसैनिक खांद्यावर भगवा झेंडा घेऊन जाताना दाखवलं आहे.

अवश्य वाचा – ‘राहत्या वॉर्डात निवडून यायचे वांदे’ मनसेच्या पोस्टरला सेनेचं चोख प्रत्युत्तर

निवडून येण्याचे वांदे असल्यामुळे शिवसेना दिल्लीश्वरांसमोर लाचारी पत्करत असून धार्मिक व भावनिक विषयांवर राजकारण केलं जात असल्याचं मनसेने आपल्या पोस्टरमध्ये म्हटलं आहे. कलानगर भागात ही पोस्टर लावण्यात आल्याचं कळतंय. सध्या मनसे प्रमुख राज ठाकरे हे विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत, यावेळी काही जुन्या शिवसैनिकांनी राज ठाकरेंची भेट घेतल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. त्यामुळे मनसेच्या या भूमिकेला शिवसेना काय उत्तर देते याकडे आता सर्वांचं लक्ष असणार आहे.

अवश्य वाचा – तुम्हाला जमत नसेल, तर राममंदिर आम्हीच बांधू – उद्धव

21
X