मुंबई: बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात आणखी १० विद्युत दुमजली वातानुकूलित बस दाखल झाल्या आहेत. या बस वांद्रे – कुर्लादरम्यान धावणार असल्याने पूर्व – पश्चिम उपनगरीय प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गेल्या काही महिन्यांपासून मुंबईत नव्या वातानुकूलित विद्युत दुमजली बसगाड्या धावत आहेत. या बसगाडीला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या बसगाड्यांची संख्या वाढविण्याची मागणी होऊ लागली आहे. ही मागणी विचारात घेऊन बेस्टच्या ताफ्यात मंगळवारी १० नवीन वातानुकूलित विद्युत दुमजली बसगाड्या समाविष्ट करण्यात आल्या आहेत. या बसगाड्या बेस्ट बस मार्ग क्रमांक ३१० वर वांद्रे बस टर्मिनस – कुर्ला रेल्वे स्थानक (प) दरम्यान धावणार आहेत.

हेही वाचा… कामाठीपुरा पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; रहिवाशांना ५०० चौरस फुटांचे घर मिळणार

लंडनच्या धर्तीवर बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात फेब्रुवारी २०२३ मध्ये विजेवर धावणाऱ्या वातानुकूलित दुमजली बस दाखल झाल्या आहेत. इंधनाची बचत आणि पर्यावरणाच्या संवर्धानसाठी या बसगाड्या ताफ्यात समाविष्ट करण्यात आल्या आहेत. सध्या बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यामध्ये ४९ विद्युत दुमजली वातानुकूलित बस आहेत. यापैकी २५ बस दक्षिण मुंबईत धावत असून या बसगाड्यांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. तर, मंगळवारपासून मुंबई उपनगरामध्ये मुख्यत: कुर्ला, वांद्रे-कुर्ला संकुल या भागातील प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी १० बस चालवण्यात येतील, अशी माहिती बेस्ट उपक्रमाकडून देण्यात आली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 10 more electric double decker buses added to best fleet these buses will run between bandra kurla mumbai print news dvr