मुंबई : महिलांवरील लैंगिक अत्याचाराच्या घटना वाढत असून त्यातच नात्याला काळिमा फासणाऱ्या घटनांचे प्रमाणही वाढले आहे. या १९ वर्षीय तरुणीने बुधवारी तिच्या वडिलांविरोधात पोलिसांकडे बलात्काराची तक्रार केली. मागील सात वर्षांपासून ते तिच्यावर लैंगिक अत्याचार करीत होते. पोलिसांनी तिच्या वडिलांना अटक केली.पीडित तरुणी आई – वडिलासोबत रहाते. ती एका महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. तिने बुधवारी पोलीस ठाण्यात आपल्या वडिलांविरोधात तक्रार केली. ती १४ वर्षांची असल्यापासून तिचे वडिल तिच्यावर लैंगिक अत्याचार करीत असल्याचे तिने तक्रारीत म्हटले आहे.

घरात कुणीही नसताना २०१८ पासून तिचे वडिल तिला अश्लील चित्रफिती दाखवायचे. अनेकदा वडिल तिच्या समोर अश्लील कृत्य करीतत होते, असेही तिने तक्रारीत म्हटले आहे. हा प्रकार असह्य झाल्याने तिने पोलिसात जाण्याचा निर्णय घेतला. निर्मल नगर पोलिसांनी तिच्या ५० वर्षीय वडिलांविरोधात बलात्कार प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम ७४, ७५, ७९, तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदातील (पोक्सो) कलम १०, १२ आणि २१ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी निर्मल नगर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने वडिलांना राहत्या घरातून अटक केली.

नात्याला काळिमा फासणाऱ्या घटना

पित्याकडून मुलींवर अत्याचार म्हणजे माणुसकीला काळिमा फासण्याच्या प्रकार असून शहरात अशा घटना वाढत आहेत. ट्रॉम्बे येथील एका शाळेत मुलांचे समुपदेश सुरू असताना १३ वर्षीय मुलीने आपली शोकांतिका सांगितली. मागील दोन वर्षांपासून तिचे सावत्र वडिल तिच्यावर लैंगिक अत्याचार करीत असल्याचे तिने सांगितले. अशा घटना वाढत आहेत. नात्यातील व्यक्तींकडून अल्पवयीन मुलींवर सर्वाधिक लैंगिक अत्याचार होत असतात, असे ‘जाणीव’ संस्थेचे समन्वयक मिलिंद पोंक्षे यांनी सांगितले. बहुतांश प्रकरणात सावत्र वडिलांकडून अत्याचार होत असतात. परंतु सख्ख्या वडिलांकडून लैंगिक अत्याचाराच्या वाढत्या घटना चिंताजनक असून ही विकृती असल्याचे पोंक्षे यांनी सांगितले.

पित्याकडून मुलीवर लैंगिक अत्याचाराच्या काही घटना

९ जुलै २०२५ – ट्रॉम्बे – सावत्र वडिल मुलीवर मागील २ वर्षांपासून लैंगिक अत्याचार करीत होते. शाळेतील समुपदनेशामध्ये या प्रकरणाला वाचा फुटली.

६ जुलै २०२५ – कांदिवली – १५ वर्षीय मुलीवर तिचे सावत्र वडिल बलात्कार करीत होते. यामुळे मुलगी घरातून पळून नालासोपारा येथे गेली होती.

२८ ऑगस्ट २०२४ – मालाड – ९ वर्षाच्या मुलीवर पित्याकडून लैंगिक अत्याचार.

१४ मे २०२५ – कांदिवली – ३५ वर्षीय इसम आपल्या १० वर्षाची आणि ८ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करीत होता.

२७ फेब्रुवारी २०२५- नालासोपारा – ३ सख्ख्या मुलींवर ५६ वर्षीय पिता लैंगिक अत्याचार करीत होता. मागील ५ वर्षांपासून हा प्रकार सुरू होता.

२९ ऑगस्ट २०२४- नालासोपारा – सावत्र पिता १५ वर्षीय मुलीवर मागील ३ महिन्यांपासून बलात्कार करीत होता.

२५ मार्च २०२५- नालासोपारा – २४ वर्षीय तरुणीवर सावत्र पित्याकडून बलात्कार. कंटाळून तरुणीने पित्यावर चाकूने प्राणघातक हल्ला