मुंबई : मालेगाव बॉम्बस्फोटाशी संबंधित खटल्याचा निकाल राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) कायद्याअंतर्गत स्थापन विशेष न्यायालयाने दिला असून साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, ले. कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह सात आरोपींची पुराव्याअभावी सुटका करण्यात आली आहे. या निकालावर राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुंबई सत्र न्यायालयात एका कामासाठी आले असताना माध्यम प्रतिनिधींनी अनिल देशमुख यांच्याशी संवाद साधला. तेव्हा ‘धर्माचा आणि दहशतवादाचा संबंध नाही’, असे अनिल देशमुख यांनी स्पष्टपणे सांगितले.
मालेगाव बॅाम्बस्फोटानंतर देशात ‘भगवा दहशतवाद’ या शब्दाची चर्चा झाली. याप्रकरणी सत्ताधारी व विरोधकांमध्ये खडाजंगी झाली होती. मात्र भगवा आणि दहशतवादाचा काहीही संबंध नाही. धर्माचा आणि दहशतवादाचा एकमेकांशी संबंध नाही. दहशतवाद हा दहशतवाद असतो, असे स्पष्ट मत अनिल देशमुख यांनी व्यक्त केले. तसेच मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील खरे आरोपी कोण? असे पत्रकारांनी विचारल्यानंतर, याप्रकरणाच्या पुढील चौकशीतून खरे आरोपी कोण हे समोर येईल, असे अनिल देशमुख म्हणाले.
दरम्यान, देशातील दहशतवादाशी संबंधित दीर्घकाळ चाललेल्या खटल्यांपैकी एक असलेल्या मालेगाव बॉम्बस्फोटाशी संबंधित खटल्याचा निकाल राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) कायद्याअंतर्गत स्थापन विशेष न्यायालयाने आज दिला असून साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, ले. कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह सात आरोपींची पुराव्याअभावी सुटका करण्यात आली आहे. मात्र हा निकाल ऐकून दुःख झाले. या निकालाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देऊ, असे मालेगावमधील प्रत्यक्षदर्शी व पीडितांचे नातेवाईक डॉ. अन्सारी अखलाक अहमद यांनी न्यायालयाबाहेर आल्यानंतर सांगितले.