मुंबई : ‘वडाळा – ठाणे – कासारवडवली मेट्रो ४’ मार्गिकेच्या कामाअंतर्गत भांडूप – सोनापूर जंक्शन येथे ५६ मीटर लांबीचा आणि ४५० टन वजनाचा स्टील स्पॅन यशस्वीपणे बसविण्यात आला आहे. महत्त्वाचे म्हणजे अत्यंत कठीण आणि आव्हानात्मक असे हे काम एका रात्रीत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) अभियंत्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पूर्ण केले. या कामाच्या अनुषंगाने आता या मार्गिकेचे बांधकाम ८४ टक्के पूर्ण झाले आहे.
एमएमआरडीएने ३२.३२ किमी लांबीच्या ‘मेट्रो ४’ मार्गिकेचे काम हाती घेतले आहे. तर या मार्गिकेचा विस्तार ‘मेट्रो ४ अ’ मार्गिकेच्या माध्यमातून कासारवडवली – गायमूख (२.७ किमी) दरम्यान करण्यात येणार आहे. ‘मेट्रो ४’ आणि ‘मेट्रो ४ अ’ मार्गिकेतील गायमूख – विजय गार्डन टप्पा डिसेंबरपर्यंत वाहतूक सेवेत दाखल करण्यात येणार आहे. विजय गार्डन – कॅडबरी जंक्शन टप्पा मार्च २०२६ मध्ये सेवेत दाखल केला जाण्याची शक्यता आहे. त्याचवेळी ‘मेट्रो ४’ मार्गिका २०२७ मध्ये पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होण्याची शक्यता आहे. ‘मेट्रो ४’ मार्गिकेचे काम निश्चित वेळेत पूर्ण करण्याच्यादृष्टीने एमएमआरडीएने कामाला वेग दिला आहे. त्यानुसार नुकताच भरपावसात एका रात्रीत एमएमआरडीएने ४५० टन वजनाचा स्टील स्पॅन बसविण्यात यश मिळविले. ५६ मीटर लांबीचा आणि ४५० टन वजनाचा स्टील स्पॅन भांडुप – सोनापूर जंक्शनवर बसविण्यात आला आहे. अत्यंत अवघड आणि आव्हानात्मक असे हे काम एमएमआरडीएच्या अभियंत्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पूर्ण केले.
दोन तुळईमध्ये हा स्टील स्पॅन ९ उच्च क्षमतेच्या क्रेन्स, दोन मल्टी-ॲक्सल पुलर्स आणि १०० हून अधिक कुशल तंत्रज्ञांच्या साहाय्याने बसविण्यात आल्याची माहिती एमएमआरडीएने दिली. या कामासाठी एमएमआरडीएला मुंबई महानगरपालिका, एमएसईडीसीएल आणि वाहतूक पोलिसांच्या अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळाले. दरम्यान, ‘मेट्रो ४’ मार्गिकेचे ८४ टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे. आता उर्वरित काम वेगाने पूर्ण करून ही मार्गिका २०२७ पर्यंत पूर्ण क्षमतेने वाहतूक सेवेत दाखल करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे.
