मुंबई : शालेय शिक्षण विभागाच्या वतीने राज्यात गेल्या अनेक वर्षांपासून विज्ञान प्रदर्शनांचे आयोजन केले जाते. आता विज्ञान प्रदर्शनांचे स्वरुपच बदलून जाणार आहे. ‘मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी’ योजनेला अंतिम स्वरुप दिले जात असून, या योजने अंतर्गत दरवर्षी राज्यातील ५१ विद्यार्थ्यांना ‘नासा’ला भेट देण्याचा संधी मिळणार आहे.
शालेय पातळीवर विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन वाढीस लागावा, या हेतून राज्यात गत अनेक वर्षांपासून विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन केले जाते. पहिल्यांदा तालुका पातळीवर विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन केले जाते. त्यात निवड झालेल्या प्रयोगांना जिल्हा पातळीवरील प्रदर्शनात संधी मिळते आणि जिल्हा पातळीवरील निवड झालेल्या प्रयोगांना राज्यस्तरावरील विज्ञान प्रदर्शनात सादरीकरणाची संधी मिळते.
आजवर राज्यस्तरावर प्रथम क्रमांक मिळवलेल्या प्रयोगाला फक्त पाच हजार रुपयांचे तर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमाकांच्या प्रयोगाला अडीच हजार रुपयांचे बक्षीस दिले जात होते. आता पहिल्या क्रमांकाच्या प्रयोगाला ५१ हजार रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. तसेच राज्यस्तरावर सादर झालेल्या एकूण सहभागी विद्यार्थ्यांपैकी पहिल्या ५१ विद्यार्थ्यांना अमेरिकेच्या नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन (नासा) या संस्थेला भेट देण्याची संधी राज्य सरकारकडून उपलब्ध करून दिली जाणार आहे.
तालुका स्तरावरील प्रदर्शनात सहभागी झालेल्या पहिल्या २१ विद्यार्थ्यांना जवळच्या विज्ञान केंद्राला भेट देण्याची संधी मिळणार आहे. जिल्हास्तरीय प्रदर्शनात सहभागी झालेल्या पहिल्या ५१ विद्यार्थ्यांना भारतीय अंतराळ संशोधन संस्थेला (इस्त्रो) भेट देण्याची संधी मिळणार आहे. ५१ विद्यार्थ्यांसह चार शिक्षक, अशा ५५ जणांना नासाला भेट देण्यासाठी सुमारे तीन कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. इस्त्रो आणि विज्ञान केंद्रांना भेट देण्यासाठी लागणाऱ्या खर्चाची तरतूदही शालेय शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात येणार आहे.
जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन वाढीस लागावा. विज्ञान, गणित विषयांची आवाड निर्माण व्हावी. विद्यार्थ्यांचा पाया पक्का व्हावा, त्यांच्या नवकल्पनांना वाव मिळून भविष्यात ते शास्त्रज्ञ म्हणून घडावेत. हा मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारीचा मुख्य उद्देश आहे.
खेड्यातील मुले थेट ‘नासा’त जाणार
शालेय पातळीवरच आणि प्रामुख्याने ग्रामीण भागातील जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या मुलांच्या वैज्ञानिक दृष्टीला बळ मिळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. पुढील वर्षापासून या योजनेची अंमलबजावणी सुरू होईल. ग्रामीण भागातील ५१ मुलांना ‘नासा’ला भेट देण्याची संधी राज्य सरकार उपलब्ध करून देणार आहे, अशी माहिती शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिली.