मरीन ड्राईव्ह परिसरात देवमाशाची (व्हेल) उलटी (ऍम्बरग्रिस ) विकण्यासाठी आलेल्या २५ वर्षीय तरुणाला मुंबई पोलिसांनी अटक केली. आरोपीकडून दोन किलो ६०० ग्रॅम ऍम्बरग्रिस जप्त करण्यात आले असून त्याची किंमत साधारण अडीच कोटी रुपये आहे. रायगड जिल्ह्यातील एका व्यक्तीने त्याला ऍम्बरग्रिस विक्रीसाठी दिल्याचे त्याने चौकशीत सांगितले आहे.
वैभव जनार्दन कालेकर असे अटक आरोपीचे नाव आहे. आरोपी रत्नागिरीतील दापोली येथील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आरोपीविरोधात मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात वन्य प्राणी संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीचे वकील ॲड अजय उमापती दुबे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कालेकर हा निर्दोष असून त्याला याप्रकरणात अडकवण्यात आल्याचे सांगितले.
गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाला संशयीत तरूण विक्रीसाठी ऍम्बरग्रिस घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार मरीन ड्राईव्ह चौपाटीजवळील ट्रायडंट हॉटेलजवळील पदपथावर उभ्या असलेल्या या तरूणाची झडती घेण्यात आली. त्यावेळी त्याच्याकडे तीन वेगवेगळ्या पाकिटांमध्ये एकूण दोन किलो ६१६ ग्रॅम ऍम्बरग्रिस सापडले. ते वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. याप्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलीस अधिक तपास करत आहेत.
देवमाशाची उलटी सुगंधी पदार्थांमध्ये वापरण्यात येते. ती दुर्मीळ असते, सहज सापडत नाही. याचा वापर नैसर्गिक अत्तर निर्मितीसाठी केला जातो. त्यामुळे काळ्या बाजारात या पदार्थाला फार मागणी आहे. वन्य प्राणी संरक्षण कायदयांतर्गत देवमाशाची उलटीची विक्री करणे हा गुन्हा आहे.