मुंबई- गोरेगाव येथे क्षुल्लक वादातून २५ वर्षीय विवाहित महिलेची तिच्या पतीने गळा आवळून हत्या केली. बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास ही घटना घडली. हत्येनंतर पळून गेलेल्या पतीला बांगूर नगर पोलिसांनी अवघ्या दोन तासात अटक केले आहे.
गोरेगाव पश्चिमेच्या भगतसिंग नगर येथे गौशिया शेख (२५) ही महिला पती वसीम शेख (२५) याच्यासोबत रहात होती. वसीमला दारू पिण्याचे व्यसन होते. त्यावरून त्या दोघांमध्ये भांडणे व्हायची. गौशियाने पतीला दारू पिण्यासाठी पैसे दिले नव्हते. त्या रागातून सोमवारी सकाळी १० च्या सुमारास वसीम याने गळा आवळून गौशियाची हत्या केली. यानंतर तो पळून गेला.
याप्रकरणी बांगूरनगर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी रेल्वे मार्गाने पळून जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार रेल्वे स्थानक परिसरात सापळा लावण्यात आला होता. दरम्यान दुपारी बाराच्या सुमारास राम मंदिर रेल्वे स्थानक परिसरातून आरोपी वसीम शेख याला अटक करण्यात आली. अवघ्या दोन तासात त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले. बांगूर नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल ठाकरे, पोलीस निरीक्षक अमित शितोळे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय सरोळकर, रंधे, पोलीस उपनिरीक्षक पियुष टारे, सायबर विङागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विवेक तांबे आदींच्या पथकाने जलदगतीने तपास करून आरोपीला अटक केली.