हातातील बेडी तोडून आरोपीने पलायन केल्याचे प्रसंग अनेक हिंदी चित्रपटांमध्ये पाहायला मिळतात. असाच एक प्रसंग आग्रीपाडा येथील कस्तुरबा मार्ग रुग्णालयात घडला. करोनाची बाधा झाल्यामुळे रुग्णालयात उपचार सुरू असताना हातचलाखीने हातातील बेड्या उघडून आरोपीने पलायन केले असून याप्रकरणी आग्रीपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आरोपी नजीम आयुब खान (२२) मानखुर्द मंडाळा येथील रहिवासी असून त्याला चोरीच्या गुन्ह्यांत मानखुर्द पोलिसांनी ३० जुलैला अटक केली होती. १ ऑगस्टला त्याला न्यायालायपुढे हजर केल्यानतंर न्यायालयाने त्याला ४ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. पण वैद्यकीय तपासणीत करोनाची लागण
झाल्याचे निष्पन्न झाल्यामुळे त्याला कस्तुरबा रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक १४ मध्ये दाखल करण्यात आले होते. तो खाट क्रमांक २० वर दाखल होता.

सुरक्षेसाठी तैनात पोलिसांनी त्याच्या हाताला बेड्या घातल्या व त्याचे एक टोक खाटेला लॉक केले होते. करोना रुग्णांचा कक्ष असल्यामुळे पोलिसांना तेथे थांबण्याची परवानगी नव्हती. पोलिसांनी कक्षाची पाहणी केली असता दरवाज्याशिवाय तेथून बाहेर जाण्यास दुसरा मार्ग नसल्यामुळे दोन पोलीस सुरक्षच्या दृष्टीने दरवाजाच्या बाहेर तैनात करण्यात आले. दर १५ मिनिटांनी पोलीस वॉर्डमध्ये जाऊन नजीम जागेवर आहे का, याची पाहणी करीत होते. रात्री दहाच्या सुमारास पोलिसांनी पाहणी केली असता नजीम जागेवर नव्हता. त्यानंतर तेथील डॉक्टर व परिचारीका यांच्याकडे चौकशी केली असता नजीम कोठे गेला याबाबत कोणालाही माहिती नव्हती. त्यानंतर पोलिसांनी शौचालय, शेजारील वॉर्ड सर्व ठिकाणी शोधले. पण नजीम कोठेच सापडला नाही.

अखेर पोलिसांनी रुग्णालयातील सुरक्षा कक्षात जाऊन सीसी टीव्ही कॅमेरातील चित्रणाची पाहणी केली. त्यावेळी आरोपी हातातील बेड्या हातचलाखीने उघडून वॉर्ड क्रमांक १४ च्या दिशेने जात असताना निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसानी रुग्णालयाबाहेर जाऊन पाहणी केली असाता आरोपी दृ्टीस पडला नाही. अखेर याप्रकरणी पोलीस शिपाई गणेश नाळे यांच्या तक्रारीवरून आग्रीपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आता मानखुर्द व आग्रीपाडा पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Accused infected with corona escaped from the hospital mumbai print news amy