मुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री संध्या यांनी नृत्याचे प्रशिक्षण घेतले नव्हते. मात्र, ‘झनक झनक पायल बाजे’ या चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांनी प्रसिद्ध कथक नर्तक आणि नृत्यदिग्दर्शक गोपी कृष्ण यांच्याकडून कथक नृत्याचे धडे घेतले. तर १९७५ मध्ये प्रदर्शित झालेला ‘चंदनाची चोळी अंग अंग जाळी’ हा त्यांचा अखेरचा चित्रपट. संध्या यांना खरी ओळख मिळाली ती ‘पिंजरा’ चित्रपटातील भूमिकेमुळे. या चित्रपटातील गाणी आणि संध्या यांच्यावर चित्रित झालेली नृत्येही लोकप्रिय ठरली.

संध्या यांचा जन्म कोल्हापूरमधला. त्यांचे मूळ नाव विजया देशमुख. त्यांचे वडील श्रीधरपंत देशमुख हे बाबुराव पेंढारकर यांच्या ललितकलादर्श कंपनीत कामाला होते. संध्या या राजकमल स्टुडिओ परिसरातच वास्तव्याला होत्या. १९९० मध्ये व्ही. शांताराम यांचे निधन झाल्यानंतर गेली कित्येक वर्षे एकट्याच राहात होत्या. संध्या यांनी चित्रपटसृष्टीतून संन्यास घेतला होता. त्यांनी ४६ वर्षांच्या कारकिर्दीत १४ चित्रपट केले. ‘झनक झनक पायल बाजे’ हा चित्रपट आणि संध्या यांची भूमिका दोन्हीला प्रेक्षकांची दाद मिळाली. पुढे ‘नवरंग’ या चित्रपटातही संध्या यांच्या नृत्य कौशल्याने प्रेक्षकांचे मन जिंकले.

संध्या यांनी ५० आणि ६०च्या दशकांत त्यांनी व्ही. शांताराम यांच्या दिग्दर्शनाखालीच बहुतांशी चित्रपट केले, मात्र त्यांची प्रत्येक भूमिका, नृत्य आजही अजरामर आहे. प्रेक्षकांच्या मनात असलेली आपली तीच प्रतिमा शेवटपर्यंत चिरंतर असावी हा संध्या यांचा आग्रह होता. त्यामुळेच त्यांनी चित्रपटसृष्टीपासून दूर झाल्यानंतर सार्वजनिक कार्यक्रमांपासूनही दूर राहणे पसंत केले. आपले विचार, तत्व शेवटपर्यंत जपणाऱ्या अभिनेत्री संध्या यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीतील एक सक्षम, देखणी अभिनेत्री हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

पिंजरा, नवरंग अशा अनेक मराठी चित्रपटांमध्ये संध्या यांच्या भूमिका गाजल्या. हिंदी सिनेसृष्टीही त्यांनी गाजवली. जितका कसदार अभिनय, तितकेच दमदार नृत्य हे त्यांचे वैशिष्ट्य होते. त्यांच्या निधनाने सिने जगताची मोठी हानी झाली आहे. त्यांच्या भूमिका अजरामर राहतील. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री