मुंबई : ‘वेदांत- फॉक्सकॉन’, ‘टाटा- एअरबस’ प्रकल्प राज्याबाहेर गेल्याबद्दल शिंदे-फडणवीस सरकारवर टीका होत असतानाच, नागपूरमधील प्रस्तावित एक प्रकल्प हैदराबादमध्ये गेल्याचा आरोप विरोधकांनी केला. यावर हा प्रकल्प महाविकास आघाडी सरकारच्या काळातच हैदराबादमध्ये सुरू झाल्याचे प्रत्युत्तर सत्ताधाऱ्यांनी दिले आहे. दुसरीकडे, उद्योग आणि कृषी या दोन मुख्य क्षेत्रांचा ‘खोके सरकार’वर विश्वास नाही हेच स्पष्ट होते, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.
हेही वाचा >>> परराज्यात जाणाऱ्या प्रकल्पांवर बोलताना राष्ट्रवादीच्या आमदाराचे मोठे विधान; म्हणाले “अजित पवार यांच्यासारखा मुख्यमंत्री…”
राजकीय अस्थिरतेमुळे गुंतवणूकदारांचा तर हवामान बदलाच्या संकटात शेतकऱ्यांचा विश्वास या सरकारने गमाविला आहे. उद्योग आणि कृषी या दोन महत्त्वाच्या क्षेत्रांचा या सरकारवर विश्वास नाही. या साऱ्यांमुळे महाराष्ट्राचे नुकसान होत असल्याची टीका माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली. नागपूरमधील मिहान प्रकल्पात येऊ घातलेला सॅफ्रन या फ्रेंच कंपनीचा प्रकल्प हैदराबादमध्ये गेल्याची टीका विरोधकांनी केली. नागपूरमध्ये पुरेशा पायाभूत सुविधा, जमीन, मुबलक पाणी उपलब्ध असताना आणखी एक प्रकल्प राज्याबाहेर गेला. उद्योजकांची महाराष्ट्रावर वक्रदृष्टी का पडत आहे, असा सवाल काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला. मात्र, हा प्रकल्प २०२१ मध्येच हैदराबादला सुरू करण्याचा निर्णय संबंधित कंपनीने घेतला होता. तसेच हा प्रकल्प ८ जुलै रोजी हैदराबादमध्ये प्रत्यक्ष सुरू झाल्याकडेही राज्य सरकारमधील उच्चपदस्थांनी लक्ष वेधले.
मोदींच्या हस्तक्षेपामुळे महाराष्ट्राची बाजू कमकुवत-पृथ्वीराज चव्हाण
वाई : आतापर्यंतच्या कोणत्याच पंतप्रधानांनी आपलं राज्य, आपलं शहर असा दुराग्रह केला नाही. कारण ते देशाचे पंतप्रधान असतात. आता मोदी जे करत आहेत ते दुर्दैवी असून त्यांच्या हस्तक्षेपामुळे महाराष्ट्राची बाजू कमकुवत झाली आहे, अशी टीका काँग्रेसचे नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सातारा येथे केली.
राज्यातून वेदांता-फॉक्सकॉनपाठोपाठ आता टाटा समूहाचा एअरबस प्रकल्प गुजरातला जाणार हे स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्रातून आणखी एक प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे राज्यातील राजकारण तापलं आहे. एअरबस प्रकल्पावरून विरोधकांकडून शिंदे, फडणवीस सरकारसह मोदींवरही जोरदार टीका होत आहे.