मुंबई- शहरात बेकायदेशीररित्या राहणाऱ्या बांग्लादेशी नागरिकांची संख्या वाढत असताना आता त्यात अफगाणी नागरिकांची भर पडली आहे. गुन्हे शाखा १ आणि गुन्हे शाखा ५ च्या पथकाने संयुक्तरित्या कारवाई करून धारावी आणि कुलाबा परिसरात बेकायदेशीरिरत्या राहणाऱ्या अफगाणीस्तानच्या सहा नागरिकांना अटक केली आहे.
बांग्लादेशी नागरिक बेकायदेशीररित्या भारतात प्रवेश करून मुंबई आणि परिसरात राहतात. ते गुन्हेगारी कारवायांमध्ये सक्रीय असतात. त्यामुळे अशा नागरिकांविरोधात पोलीस सतत कारवाई करत असतात. आता बांग्लादेशी नागरिकांपाठोपाठ अफगाणी नागरिक पोलिसांची डोकेदुखी बनली आहे.
धारावी, कुलाब्यातून धरपकड
मुंबईच्या विविध परिसरात अफगाणीस्तानातील नागरिक वास्तव्य करत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखा १ आणि गुन्हे शाखा ५ च्या पथकाने संयुक्तरिक्या शोधमोहीम हाती घेतली. धारावी आणि कुलाबा परिसरात छापे घालून ६ जणांना ताब्यात घेण्यात आले. अब्दुल नौरोजी (४७) मोहम्मद खाकसर (२४), अमीर उल्लाह (४८), झिया उल हक अहमदी (३६) मोहम्मद इब्राहीम गजनवी (३६) आणि असद खान तारा काई (३६) अशी या आरोपींची नावे आहे. ते अफगाणीस्तानमधील काबूल येथील रहिवासी आहेत.
वैद्यकीय व्हिसा मिळवून भारतात प्रवेश
याबाबत माहिती देताना गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की आरोपी २०१५ ते २०१९ या कालवाधीत वैद्यकीय व्हिसा मिळवून भारतात आले होते. व्हिसा संपल्यावर ते भारतात बनावट नाव आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे बेकायदेशीरित्या वास्तव्य करत होते. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना पुन्हा अफगाणीस्तानात पाठविण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. अशा प्रकारे बेकायदेशीरपणे राहणाऱ्या अफगाणी नागरिकांची संख्या मोठी असल्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे.
या पथकाने केली कारवाई
पोलीस उपायुक्त (गुन्हे) राजतिलक रोशन, सहाय्यक पोलीस निरीक्षक (डी-दक्षिण) दिनकर शिलवटे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा ५ ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक घनश्याम नायर आणि गुन्हे शाखा १ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय कुलकर्णी यांच्या पथकातील पोलीस अधिकारी आणि कर्मचार्यांनी ही कारवाई करत अफगाणी नागरिकांना अटक केली.
