मुंबई : सीएसएमटी स्थानकातील फलाट क्रमांक १ वरून मंगळवारी सकाळी पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या एका लोकलच्या डब्याची दोन चाके रुळावरून घसरली आणि ऐन गर्दीच्या वेळी हार्बर लोकल गाड्यांचा खोळंबा झाला. लोकल पुढे जाण्याऐवजी मागे आली आणि ती बफरला धडकली. दरम्यान, रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर रुळावरून घसरलेला लोकलचा डबा पूर्ववत केला आणि सुमारे दोन तास ३२ मिनिटांनी म्हणजे दुपारी १२.११ च्या सुमारास फलाट क्रमांक १ वरील लोकल सेवा सुरू करण्यात रेल्वेला यश आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ऐन गर्दीच्या वेळी झालेल्या या अपघातामुळे हार्बरवरील वाहतूक विस्कळीत झाली आणि प्रवाशांना इच्छितस्थळी पोहोचण्यासाठी पर्याय शोधण्यासाठी धावाधाव करावी लागली. सीएसएमटी स्थानकातून मंगळवारी सकाळी ९.३९ वाजता पनवेलच्या दिशेने निघालेल्या लोकलच्या मागील चौथ्या डब्याची दोन चाके रूळावरून घसरली. या लोकलला पुढे जाण्यासाठी सिग्नलही मिळाला होता. मात्र ही लोकल पुढे जाण्याऐवजी मागे आली आणि बफरला धडकली. यामुळे लोकल वा बफरचे कोणतेही नुकसान झाले नाही. तर प्रवासीही जखमी झाले नाहीत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

दरम्यान, ऐन गर्दीच्या वेळी ही घटना घडल्यामुळे प्रवाशांची एकच तारांबळ उडाली. अपघाताची माहिती मिळताच रेल्वे कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र यामुळे हार्बरवरील लोकल सेवेचा बोजवारा उडाला आहे. सीएसएमटी स्थानकात हार्बर लोकलसाठी दोनच फलाट आहेत. फलाट क्रमांक १ वर अपघात झाल्यानंतर तात्काळ फलाट क्रमांक २ वरून लोकल सेवा सुरू ठेवण्यात आली होती. मात्र एकच फलाटावरून हार्बर सेवा सुरू असल्याने अप-डाउन लोकल गाड्याचे वेळापत्रक विस्कळीत झाले. परिणामी, सीएसएमटी स्थानकाच्या दिशेने येणाऱ्या हार्बर लोकल विलंबाने धावू लागल्या. कार्यालयात निघालेल्या अनेक नागरिकांना त्याचा फटका बसला. घसरलेला डबा रुळावर आणण्याचे काम सुरू असल्याची माहिती मध्य रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.

दरम्यान, रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने सीएसटीएम स्थानकात धाव घेतली आणि फलाट क्रमांक १ वर रुळावरून घसरलेला लोकलचा डबा पूर्ववत केला. त्यानंतर १२.११ च्या सुमारास फलाट क्रमांक १ वरून लोकल सेवा सुरू झाली.

चौकशी करणार

एैन गर्दीच्या वेळी सीएसटीएम स्थानकातील फलाट क्रमाक १ वरून सुटणारी लोकल अचानक मागे गेली आणि बफरवर धडकली. त्यामुळे लोकलचा एक डबा रुग्णावरुन घसरला. या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल, असे मध्य रेल्वेतील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After 2 hours 32 minutes derailment harbour local service started mumbai print news asj