मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांच्या देशाबाहेरील अभ्यास दौऱ्याच्या अनुदानात भरीव वाढ करण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला आहे. प्रति शेतकरी अनुदान मर्यादा एक लाखा रुपयांवरून दोन लाख रुपये करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयाचा प्रयोगशील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
राज्यातील शेतकऱ्यांना विविध प्रगत देशातील विकसीत आणि आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती होण्यासाठी तसेच शेतमालाची निर्यात, बाजारपेठेची मागणी, शेतीमाल प्रक्रियेसह त्या- त्या देशातील कृषी क्षेत्रात वापरले जाणारे अद्यायावत तंत्रज्ञान अवगत करून त्याचा वापर राज्यातील शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात करण्यासाठी सहाय्य करणे, परदेशातील संस्था, कंपन्या, शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष चर्चा करून राज्यातील शेतकऱ्यांचे ज्ञान आणि क्षमता वाढविण्यासाठी कृषी विभागाकडून परदेश दौऱ्यांचे आयोजन केले जाते.
यापूर्वी प्रति शेतकरी एक लाख रुपयांचे अनुदान दिले जात होते. त्यानंतर वाढलेली महागाई, विमानाच्या तिकिटात झालेली वाढ, संबंधित देशात राहण्याच्या खर्चात वाढलेली वाढ गृहीत धरून अनुदानात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार शेतकऱ्याने परदेश दौऱ्यासाठी केलेल्या खर्चाच्या पन्नास टक्के रक्कम किंवा दोन लाख रुपये, यापेक्षी जी रक्कम कमी असेल, त्या मर्यादेत अनुदान दिले जाणार आहे.
इस्त्रायल, युरोप, ऑस्ट्रेलिया, चीनला पसंती
राज्यातील प्रयोगीशील शेतकरी शेती क्षेत्रातील नवनवे प्रयोग, तंत्रज्ञान जाणून घेण्यासाठी, आत्मसात करण्यासाठी इस्त्रायलला प्राधान्य देतात. त्यानंतर अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया आणि चीन आदी देशांना शेतकरी भेटी देतात. प्रामुख्याने शेतीतील यांत्रिकीकरण, नवी वाणं, फळपिकांच्या विविध जाती, संकरीत बियाणे, हवामान अनुकूल संरक्षित शेती आदींचा अभ्यास करण्यासाठी शेतकरी परदेश दौऱ्यांवर जात असतात. मात्र, करोना टाळेबंदीनंतर वाढलेली महागाई शेतकऱ्यांच्या परदेश दौऱ्याच्या मुळावर आली होती. त्यामुळे अनुदानात वाढ करण्याची मागणी केली जात होती.