मुंबई : जून महिन्यात अहमदाबाद येथे झालेल्या एअर इंडियाच्या विमानाच्या दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी करावी, या मागणीसाठी विमानाचे वैमानिक कॅप्टन सुमित सभरवाल यांच्या वडिलांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका केली आहे. विमान दुर्घटनेच्या तपासासाठी सध्या कार्यरत असलेल्या विमान अपघात चौकशी ब्युरोकडून (एएआयबी) होणारी चौकशी थांबवावी, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.

अहमदाबाद विमानतळानजीक १२ जून २०२५ रोजी एअर इंडियाच्या विमानाचा अपघात झाला होता. या अपघातात विमानातील २४१, तर अन्य १९ जणांचा मृत्यू झाला होता. विमान अपघात चौकशी ब्युरोने (एअरक्राफ्ट ॲक्सिडंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो) या घटनेबाबतचा प्राथमिक अहवाल जुलै महिन्यात प्रसिध्द केला होता.

दुर्घटनाग्रस्त विमानाचे वैमानिक सुमित सभरलवाल यांचे ९१ वर्षांचे वडिल पुष्कराज सभरवाल यांनी या अहवालावर नाराजी व्यक्त केली होती. हा अहवाल अपूर्ण व दिशाभूल करणारा असल्याचे त्यांनी म्हटले होते. आता त्यांनी याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

याचिकेत मागणी काय ?

विमान अपघात चौकशी ब्युरोचा अहवाल रद्द करून या संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी पुष्कराज सभरवाल यांनी केली आहे. यासाठी फेडरेशन ऑफ इंडियन पायलट्स या संस्थेसोबत त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. विमान अपघात चौकशी ब्युरोचा अहवाल पक्षपाती असून त्यात अनेक त्रुटी असल्याचा आरोप या याचिकेत करण्यात आला आहे. या अहवालात उत्पादक कंपन्यांना (बोईंग व जनरल इलेक्ट्रिक) दोषमुक्त केल्याचे दिसून येत आहे. हा अहवाल अपूर्ण व दिशाभूल करणारा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. महत्त्वाचे तांत्रिक घटक दुर्लक्षित केल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. सध्याची चौकशी रद्द करून सर्व नोंदी न्यायालयीन देखरेखीखालील समितीकडे हस्तांतरित कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे. स्वतंत्र व तज्ज्ञांच्या नेतृत्वाखालील चौकशी केल्यास ती नि:पक्षपणे होईल, न्यायालयीन चौकशीमुळे जनतेचा विश्वास मिळवता येईल आणि अशा दुर्घटना भविष्यात घडू नये यासाठी ठोस उपाययोजना करता येतील, असेही सभरवाल यांनी याचिकेत म्हटले आहे.

सध्याची चौकशी कॅप्टन सभरवाल यांच्याविरोधात

दिवगंत कॅप्टन सुमित सभरवाल यांना ३० वर्षांहून अधिक काळ अनुभव होता. त्यांनी १५ हजार तासांहून अधिक उड्डाणे केली होती. बोईंग ७८७ ताफ्यातील ते सर्वाधिक अनुभवी कमांडरपैकी एक होते. मात्र सध्याची चौकशी सुमित सभरवाल यांच्या विरोधात पूर्वग्रहदूषित वृत्तीने सुरू आहे, असा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. मयत व्यक्ती स्वतःचे संरक्षण करू शकत नाही. त्यामुळे या एकतर्फी अहवालात त्यांची प्रतिमा मलिन करण्यात आली आहे, शिवाय अपघाताचे खरे कारण न समजल्याने सार्वजनिक सुरक्षेलाही धोका निर्माण होत आहे, असे याचिकेत म्हटले आहे.

प्राथमिक अहवालात अनेक त्रुटी

विमान अपघात चौकशी ब्युरोच्या (एएआयबी) प्राथमिक अहवालात अनेक विसंगती असल्याचे याचिकेत म्हटले आहे. दुर्घटनाग्रस्त विमानात अनेक तांत्रिक त्रुटी होत्या. मात्र त्या तांत्रिक त्रुटींकडे दुर्लक्ष करून मानवी त्रुटीवर दोष ठेवण्यात आला असल्याचे सभरवाल यांनी याचिकेत म्हटले आहे. फ्लाइट डेटा रेकॉर्डरचे विश्लेषण करण्यात आले नव्हते, याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे.

विमान अपघात चौकशी ब्युरोवर गंभीर आरोप

विमान अपघात चौकशी ब्युरोच्या (एएआयबी) ५ सदस्यीय पथकाने तपास केला होता. मात्र तसे करताना नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वांचे उल्लंघन करण्यात आले आहे. या पथकात नागरी उड्डाण महासंचालनालयाचे अधिकारी आणि बोईंग तसेच जनरल इलेट्रीकल या कंपन्यांच्या प्रतिनिधिंचा समवाेश होता. मात्र याच कंपन्यांची उपकरणे विमानात होती. त्यामुळे त्याच कंपनीच्या अधिकाऱ्यांचा पथकातील समावेश तपासाच्या निष्पक्षतेवर संशय निर्माण करतो, असे याचिकेत म्हटले आहे. विमानातील कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डिंगच्या माध्यमांना दिल्याबद्दलही चिंता व्यक्त करण्यात आली आहे. अशा ध्वनीफीती सार्वजनिक करता येत नाहीत. मात्र या ध्वनीफीतीचा निवडक भाग माध्यमांना उपलब्ध करण्यात आला आणि त्यामुळे कॅप्टन सुमित सभरवाल यांची प्रतिमा मलीन झाली, असाही आरोप याचिकेत करण्यात आला आहे.