मुंबई : विविध समाजमाध्यमांवरून विनापरवानगी छायाचित्रांचा वापर केला जात असल्याच्या प्रकाराने त्रस्त अभिनेता अक्षय कुमार यानेही व्यक्तिमत्त्व हक्क संरक्षणासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायालयानेही त्याच्या याचिकेची दखल घेऊन त्याला अंतरिम दिलासा देण्याचे स्पष्ट केले आहे.
छायाचित्रांचा विनापरवानगी वापर केला जात असल्याने अभिनेत्याच्या केवळ प्रतिष्ठेलाच धक्का पोहोचत नाही तर त्याच्या परिणामांनाही त्याला तोंड द्यावे लागते, असेही न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या एकलपीठाने उपरोक्त बाब स्पष्ट करताना नमूद केले.
तत्पूर्वी, हे प्रकरण केवळ अक्षय आणि त्याच्या कुटुंबापुरते मर्यादित नाही तर मोठ्या प्रमाणात जनतेशीही संबंधित आहे. अनेकवेळा, एखाद्या बाबीबद्दल स्पष्टीकरण प्रसिद्ध करण्यापूर्वीच नुकसान होऊ शकते, असा दावा अक्षय याच्यावतीने करण्यात आला. अक्षय याचा दावा त्याच्या व्यक्तिमत्त्व आणि प्रसिद्धी अधिकारांचे थेट उल्लंघन व अनधिकृत व्यावसायिक शोषण रोखण्यासाठी आहे. त्यात, त्याचे खरे नाव, बॉलिवूडमधील नाव, प्रतिमा, समानता, आवाज, विशिष्ट प्रकारची शैली, पद्धत आणि इतर ओळखण्यायोग्य वैशिष्ट्ये समाविष्ट आहेत.
डीपफेक प्रतिमा आणि चित्रफिती, बनावट वस्तू, फसव्या जाहिराती, खोटे सदिच्छा दूत समर्थक आणि यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम, एक्स (पूर्वीचे ट्विटर) व विविध ई-वाणिज्य संकेतस्थळे या व्यासपीठांवर अक्षयच्या व्यक्तीरेखेचा मोठ्या प्रमाणात गैरवापर केला जात असल्याचा आरोप करून त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तसेच, हे प्रकार रोखण्याबाबतचा अंतरिम आदेश देण्याची मागणी केली आहे.