मुंबई : आर्थिक परिस्थिती नाजूक असल्यानेच दसरा-दिवाळी अशा सणांमध्ये गेली दोन वर्षे सरकारच्या वतीने देण्यात येणारा ‘आनंदाचा शिधा’ यंदा वितरित केला जाणार नाही. तसेच ‘शिवभोजन थाळी’ या स्वस्तात भोजन पुरविणाऱ्या योजनेतही काटकसर करावी लागत असल्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी सोमवारी स्पष्ट केले.

शिवभोजन योजना सुरू ठेवण्यासाठी ६० कोटी रुपयांची गरज असताना फक्त २० कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. त्यामुळे योजनेत काटकसर करावी लागणार असल्याचे भुजबळ म्हणाले. अनावश्यक शिवभोजन केंद्रे बंद करावी लागणार आहेत. अनेक केंद्रांत अनियमितता सुरू आहे. एका शिवभोजन केंद्रात सिमेंटची पोती भरून ठेवल्याचे निदर्शनास आले आहे. अशी केंद्रे बंद केली जातील, असे भुजबळ यांनी सांगितले. आर्थिक तरतूद नसल्यामुळे नव्या शिवभोजन केंद्रांना मंजुरी दिली जाणार नाही तसेच थाळ्यांची संख्याही कमी करण्यात येईल, असे ते म्हणाले.

‘आनंदचा शिधा’ योजना काय?

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना ही योजना सुरू झाली. २०२२च्या दिवाळीला पहिल्यांदा या ‘किट’चे वितरण करण्यात आले. त्यात एक किलो चणा डाळ, साखर आणि एक लिटर खाद्यातेल, या वस्तूंचा समावेश होता. २०२३ मधील गुढीपाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, गौरी-गणपती आणि दिवाळीनिमित्त आणि २०२४ मध्ये अयोध्येत राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सरकारने ‘आनंदाचा शिधा’ वाटला होता.

‘लाडकी बहीण’ योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर ताण आहे. तरीही ही योजना गरजेचीच आहे. ग्रामीण भागातील लाखो महिलांना योजनेमुळे आधार मिळाला आहे. मात्र सरकारचे उत्पन्न वाढत नाही, तोपर्यंत खर्चात काटकसर करावी लागणार आहे. – छगन भुजबळ, अन्न व नागरी पुरवठामंत्री