मुंबई : अंधेरी येथे झालेल्या एका चोरीचा छडा पोलिसांनी मोबाइल मनोऱ्याच्या डम्प डेटावरून लावला. आरोपी मोबाइलवर बोलत असल्याचे सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रण पोलिसांना मिळाले होते. त्यावरून पोलिसांनी परिसरातील मोबाइल मनोऱ्यातील त्यावेळी झालेल्या एकूण कॉल्सचे तपशील (डम्प डेटा) मिळवला आणि त्यानंतर तांत्रिक तपास करून तीन जणांच्या टोळीला अटक केली. या टोळीने यापूर्वी केलेल्या तीन घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे.

अंधेरीत राहणारे धनंजय दुबे (६३) यांचे अंधेरी पूर्व येथील नागरदास क्रॉसरोडवरील मिश्रा कुंज या ठिकाणी कार्यालय आहे. त्यांनी आपल्या कार्यालयातील टेबलाच्या खणात १ लाख ७० हजार रुपये ठेवले होते. अज्ञात व्यक्तीने ३० एप्रिल ते २ मे या कालावधीत त्यांच्या कार्यालयात प्रवेश करून ही रक्कम चोरली. याबाबत अंधेरी पोलीस ठाण्यात ३ मे रोजी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणाचा तपास अंधेरी पोलीस आणि गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पोलीस करीत होते. यासाठी दोन वेगवेगळी पथके तयार करण्यात आली होती. सीसी टीव्ही कॅमेऱ्यामध्ये दिसणाऱ्या आरोपींची ओळख पटत नव्हती. चोरी केल्यानंतर आरोपी गेलेल्या दिशेला पोलिसांनी माग काढायला सुरवात केली. या मार्गावरील सुमारे १०० खासगी आणि सरकारी कार्यालयांतील सीसी टीव्ही कॅमेऱ्यांतील चित्रण तपासण्यात आले. मात्र आरोपींचा थांगपत्ता लागत नव्हता.

मोबाइल मनोऱ्याच्या डम्प डेटावरून तपास

एका ठिकाणी आरोपी मोबाइलवर बोलत असल्याचे सीसी टीव्ही कॅमेऱ्याच्या चित्रणात आढळले. त्या परिसरातील मोबाइल मनोऱ्याचा डम्प डेट मिळविण्यात आला. त्यावरून या परिसरातून किती कॉल्स झाले त्याचे तपशील मिळविण्यात आले. त्याची छाननी करून दोन संशयित मोबाइल क्रमांक मिळविण्यात आले. त्यावरून पुढील शोध सुरू करण्यात आला. या दोन्ही मोबाइलचे लोकेशन नायगाव येथील वाकीपाडा परिसरात आढळले. या दोन्ही संशयितांची माहिती काढून सापळा रचण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक परकारळे आणि त्यांच्या पथकाने नायगावच्या वाकीपाडा येथे छापा टाकला.

यावेळी अरमान नजीर शेख (१९), अनिकेत नांदे (१९) आणि साहित शिंदे (१९) या तीन आरोपींना अटक करण्यात आली. तिन्ही आरोपी सराईत गुन्हेगार आहेत. यापूर्वी त्यांनी अंधेरी आणि नेहरूनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत केलेले तीन गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले. पोलिसांनी आरोपींकडून रोख १ लाख ७० हजार रुपये हस्तगत केले. या टोळीतील सदस्य दिवसा रेकी करून रात्रीच्या वेळी घरफोडी करीत होते.

अंधेरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश मचिंदर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक परकाळे, तसेच गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पेडणेकर, सूर्यवंशी, शिंदे, म्हात्रे, लोंढे, पाटील, मोरे आणि पिसाळ यांच्या पथकाने ही कामगिरी केली.