पूर्व मुक्त मार्ग आणि पांजरपोळ जोडरस्ता येथे माहुल खाडीवरील दोन पुलांच्या बाजूचा रस्ता वारंवार खचत आहे. त्यामुळे आता रस्त्याची पुन्हा एकदा दुरुस्ती करून त्यावर पूल बांधण्यात येणार आहे. येथील जमीन भुसभुशीत असल्यामुळे तेथे पूल बांधण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेच्या पूल विभागाने घेतला आहे.

हेही वाचा >>> मुंबई : चर्चगेट रेल्वे स्थानकात रंगला विद्यार्थ्यांचा नृत्याविष्कार

मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने पूर्व मुक्त मार्गाचे बांधकाम करून तो देखभालीसाठी मुंबई महानगरपालिकेच्या पूल विभागाला २०१५ मध्ये हस्तांतरित केला. येथील आणिक पांजरपोळ जोडरस्ता येथील माहुल खाडीवर सध्या दोन पूल आहेत. या पुलांच्या दोन्ही बाजूचा रस्ता खचल्यामुळे वाहनांना दणके बसतात व त्यामुळे अपघात होण्याची शक्यता असते. तसेच या ठिकाणची जमीन कमकुवत असल्यामुळे नवीन रस्ता बांधल्यानंतरही तो पुन्हा पुन्हा खचतो. त्यामुळे या ठिकाणी पूल बांधण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे. तसेच या ठिकाणी असलेल्या पर्जन्य जलवाहिन्यांचा उतार विरुद्ध दिशेने असल्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचते. त्यामुळे पर्जन्य जलवाहिन्यांच्या पुनर्बांधणीचेही कामही करण्यात येणार आहे. या कामासाठी महानगरपालिका ४६ कोटी खर्च करणार आहे.