मुंबई : भटक्या श्वानांच्या हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने तसेच परिसरात भटक्या श्वानांमुळे घाणीचे साम्राज्य वाढल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने भटक्या श्वानांना खाद्यपदार्थ न देण्याचा आदेश नुकताच जाहीर केला. या आदेशाविरोधात रविवारी शिवाजी पार्क येथे प्राणिप्रेमी संघटनांनी आंदोलन आणि स्वाक्षरी मोहीम राबवली.
हेही वाचा >>> अडीच फूट उंची असणाऱ्या अझीमचं ठरलं लग्न! आता थेट पंतप्रधान आणि मुख्यमंत्रींनाच देणार लग्नाचं आमंत्रण
देशातील सर्वच शहरांमध्ये भटक्या श्वानांचा उपद्रव वाढत असल्याने स्थानिकांना त्याचा त्रास होऊ लागला आहे. पादचाऱ्यांच्या किंवा धावत्या वाहनांच्या मागे धावत सुटणे, भटक्या श्वानांकडून नागरिकांना चावा घेणे, तर चावा घेतल्याने अनेक नागरिक दगावल्याच्या घटनादेखील झाल्या आहेत. भटक्या श्वानांना आयते खाद्यपदार्थ मिळत असल्याने त्याची टोळी निर्माण झाली असून त्यांचे हल्ले करण्याचे प्रमाण अधिक झाले आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने भटक्या श्वानांना खाद्यपदार्थ द्यायचेच असेल तर ते प्राणिप्रेमींनी घरात नेऊन द्यावे. सार्वजनिक ठिकाणी नाही, असे स्पष्ट आदेश दिले आहेत. रस्त्यावर, सार्वजनिक जागेवर भटक्या कुत्र्यांना अन्न देणाऱ्या प्राणिमित्रांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश खंडपीठाने पोलीस आणि शहर प्रशासनाला दिले आहेत. या आदेशाच्या विरोधात रविवारी सायंकाळी पाच ते सात वाजेच्या दरम्यान पेटा, पीएफए या प्राणिप्रेमी संघटनांसह अनेक संघटनांनी आंदोलन केले.
नागपूर खंडपीठाच्या आदेशाविरोधात शांततापूर्ण आंदोलनात विविध प्राणी हक्क स्वयंसेवी संस्था रविवारी शिवाजी पार्क येथे सहभागी झाल्या. श्वानांना खाद्यपदार्थ मुद्दय़ावर प्राणिप्रेमींकडून एक हजारांहून अधिक ऑनलाइन स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या आहेत.