मुंबईवरुन गोव्याला जाणाऱ्या क्रूझवर २ ऑक्टोबर रोजी केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी पथकाने म्हणजेच एनसीबीने केलेल्या कारवाईमध्ये भाजपाचे नेते मोहित कम्बोज यांचा मेहुणा ऋषभ सचदेवालासुद्धा ताब्यात घेण्यात आल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केलाय. आज मुंबईमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत नवाब मलिक यांनी एनसीबीने ११ जणांना क्रूझवरुन ताब्यात घेतल्यानंतर तीन जणांना भाजपा नेत्यांच्या आदेशाने सोडून देण्यात आल्याचा आरोप केलाय. यावेळी त्यांनी मुंबईमधील भाजपाच्या युवा विभागाचे माजी अध्यक्ष महीत कंबोज यांच्या मेहुण्याचाही समावेश असल्याचं म्हटलंय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

१३०० लोक असणाऱ्या जहाजावर तुम्ही छापा टाकला. १२ तास सुरु असलेल्या छाप्यात ११ लोकांना ताब्यात घेत एनसीबीच्या कार्यालयात नेलं.
तीन जणांना का सोडलं?, याचं उत्तर एनसीबीला द्यावं लागेल असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. तसेच पुढे बोलताना मलिक यांनी दिल्लीपासून महाराष्ट्रापर्यंत भाजपाच्या नेत्यांनी फोन करुन या तिघांना सोडण्यास सांगितल्याचा आरोपही केलाय. सोडण्यात आलेल्या लोकांमध्ये आमीर फर्निचरवाला, ऋषभ सचदेवा, प्रतिक गाबा यांचा समावेश होता असं मलिक म्हणालेत. पण मलिक यांनी आरोप केलेले मोहीत कंबोज नक्की आहेत तरी कोण जाणून घेऊयात…

> मोहित कम्बोज यांचा जन्म ३० एप्रिल १९८४ रोजी झाला. ते मुंबई भाजपाचे माजी सचिव आहेत.

> मोहित कंम्बोज हे भाजपाच्या मुंबई विभागाचे माजी महासचिव आहेत. त्यांच्याविरोधात एका प्रकरणामध्ये सीबीआय सुद्धा चौकशी करत आहे.

> कम्बोज हे २०१६ ते २०१९ दरम्यान भाजपाच्या मुंबई युवा शाखेचे अध्यक्षही होते.

> २०१९ मध्ये त्यांना मुंबई भाजपाच्या महासचिवपदी नियुक्त करण्यात आलं.

> मागील वर्षी म्हणजेच २०२० साली मुंबईमध्ये केंद्रीय तपास यंत्रणा म्हणजेच सीबीआयने ५७ कोटींच्या बँक घोटाळ्याप्रकरणी ठिकठिकाणी केलेल्या छापेमारीमध्ये कम्बोज यांच्या घरावरही छापा टाकण्यात आलेला.

> २०१२ ते २०१९ दरम्यान कम्बोज हे सराफ उद्योगाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ‘इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनचे (आयबीजेए)’ राष्ट्रीय अध्यक्ष राहिले आहेत.

> २०१३ ते २०१४ दरम्यान कम्बोज मुंबई भाजपाचे उपाध्यक्ष होते.

> दिडोंशी मतदारसंघामधून त्यांनी भाजपाच्या तिकीटावर २०१४ साली विधानसभा निवडणूकही लढवली आहे.

> २१ सप्टेंबर २०१३ रोजी कम्बोज यांनी भाजपामध्ये प्रवेश घेतल्यानंतर महिन्याभरातच त्यांना मुंबई भाजपाचं उपाध्यक्ष पद देण्यात आलं.

> त्यानंतर कम्बोज यांना महिन्याभरामध्ये मुंबई भाजपाच्या उत्तर भारतीय मोर्चाचे अध्यक्षपद देण्यात आलं.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aryan khan drugs case who is bjp leader mohit kamboj scsg