मुंबई : मुंबई महानगर परिसरात जलमेट्रो हा उत्तम पर्याय असून त्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत. अगदी नवी मुंबई विमानतळापर्यंत जलमेट्रो नेण्याचा गांभीर्याने विचार सुरु आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्र्यांच्या अतिरिक्त मुख्य सचिव व मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी केले.

‘इंडियन मर्चंट चेंबर’तर्फे भिडे यांचा वार्तालाप आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी त्या बोलत होत्या. इंडियन मर्चंट चेंबरच्या अध्यक्षा सुनीता रामनाथकर यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी भिडे यांच्या हस्ते चेंबरच्या मुंबई पर्यावरण सप्ताहाच्या लोगोचे अनावरणही करण्यात आले. भिडे म्हणाल्या की, महाराष्ट्र सागरी मंडळामार्फत याबाबत प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. सध्या कोची येथे जलमेट्रो प्रकल्प यशस्वी झाला आहे. हा प्रकल्प यशस्वी करणाऱ्या कोची शिपयार्ड कंपनीला मुंबई महानगर परिसरात सुरु करावयाच्या जलमेट्रो प्रकल्पाचा अभ्यास सादर करण्यात सांगण्यात आले आहे. सध्या वाहतुकींच्या विविध प्रकारांवर पर्याय प्रभावी होऊ शकतो, याची कल्पना असल्यामुळे गंभीर विचार सुरु आहे.

भुयारी मेट्रोमध्ये मोबाईल फोनचे नेटवर्क उपलब्ध नाही, ही अडचण लवकरच दूर होणार आहे. सर्व भुयारी मार्गात फाईव्ह जी नेटवर्क उपलब्ध करुन देण्याबाबत विविध दूरसंचार कंपन्यांशी बोलणी सुरु आहेत. याशिवाय भारत संचार निगम लिमिटेडला विनंती करण्यात आली आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय दूरसंचार मंत्र्यांनाही पत्र लिहिले आहे. याबाबत लवकरच सकारात्मक प्रतिसाद मिळेल, असा विश्वास व्यक्त करुन भिडे म्हणाल्या की, सध्या तिकिट खिडकी परिसरात वायफाय सेवा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. ही सेवा फलाटावरही उपलब्ध व्हावी, यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

भुयारी मेट्रो सेवा सुरु झाल्यानंतर त्याचा वापर करणाऱ्या प्रवाशांना किमान चालण्यासारखे पदपथ हवेत, याबाबत संबंधित यंत्रणांशी चर्चा करणार आहोत. आता विविध यंत्रणांचीही मानसिकताही बदलायला लागली आहे. भुयारी मेट्रोची आकर्षक स्थानके पाहिल्यानंतर या यंत्रणांनाही त्याच पातळीवरील पायाभूत सुविधा उपलब्ध करुन द्यावा लागणार आहेत. राज्य शासनाचा मोठ्या व अत्यावश्यक पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या दिशेने प्रयत्न सुरु असल्यामुळे आता पादचारी सुविधा उपलब्ध करून द्याव्या लागणार असल्याचे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. पदपथ सुधारण्याबाबत राजकीय इच्छाशक्ती हवी. ती निर्माण करता येऊ शकेल, असेही त्या म्हणाल्या. मेट्रो स्थानकांवरुन अन्यत्र जाण्यासाठी बेस्ट सेवा उपलब्ध व्हावी, या दिशेने हालचाल सुरु आहे. सध्या बेस्ट प्रशासनाकडे अडीच हजार बसगाड्या आहेत. एकेकाळी ही संख्या साडेचार हजार इतकी होती. मुंबईसाठी दहा हजार बसगाड्यांची आवश्यकता आहे. लवकरच त्या दिशे‌ने बसगाड्यांच्या संख्येत वाढ होणार असल्याचेही भिडे यांनी सांगितले.