मुंबई : फेसबुक आणि व्हॉट्सअॅपद्वारे पाकिस्तान इंटेलिजन्स ऑपरेटीव्हला प्रतिबंधित क्षेत्राची माहिती दिल्याच्या प्रकरणात राज्य दहशतवाद विरोधी पथकाने एकाला अटक केली. आरोपी सध्या पोलीस कोठडीत असल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली. राज्याच्या दहशतवाद विरोधी पथकाला (एटीएस) एक व्यक्ती प्रतिबंधित केलेल्या क्षेत्रातील गोपनीय व संवेदनशील माहिती पाकिस्तान इंटेलिजन्स ऑपरेटीव्हला पुरवत असल्याची माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे एटीएसने एका संशयीताला अटक केली आहे.

दहशतवाद विरोधी पथकाकडून करण्यात आलेल्या प्राथमिक चौकशीत आरोपीची ओळख नोव्हेंबर २०२४ मध्ये फेसबुकवर एका पाकिस्तानी गुप्तचराशी झाली होती. नोव्हेंबर २०२४ ते मार्च २०२५ दरम्यान या संशयिताने व्हॉट्स अॅपद्वारे या ऑपरेटीव्हला भारतातील गोपनीय व संवेदनशील माहिती वेळोवेळी पुरवल्याचे उघड झाले आहे.

या प्रकरणात दहशतवाद विरोधी पथक, पोलीस ठाणे येथे अटक आरोपी व त्याच्या संपर्कातील इतर दोन अशा एकूण तीन जघांविरुद्ध शासकीय गोपनीयता अधिनियम १९२३ चे कलम ३ (१) (ब), ५ (अ) तसेच भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ६१ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यात संशयीत इसमाला अटक करण्यात आली असून तो सध्या पोलीस कोठडीत आहे. दहशतवाद विरोधी पथक या प्रकरणी अधिक तपास करीत आहे.